मशिदीत नमाज हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

मशिदीमध्ये नमाज पठण करणे हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही या 24 वर्षांपूर्वीच्या निकालावर आज सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. तसेच या निकालाचा पुनर्विचार करण्यासाठी घटनापीठाकडे हे प्रकरण सोपविण्याची गरज नाही, असेही स्पष्ट केले. दरम्यान, यामुळे अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. 29 ऑक्टोबरपासून ही सुनावणी होणार आहे. दररोज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. दोन विरुद्ध एक न्यायमूर्ती असा बहुमताने निर्णय देण्यात आला. न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर यांनी प्रकरण घटनापीठाकडे सोपवावे असे मत मांडले.

धार्मिक आस्था लक्षात घ्या – न्या. नझीर

न्यायमूर्ती नझीर यांनी स्वतंत्र मत नोंदविताना हा खटला सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवावा असे म्हटले आहे. मशिदीत नमाज पठण हा इस्लामचा अभिन्न अंग आहे की नाही याचा निकाल देताना धार्मिक आस्था लक्षात घेतली पाहिजे. त्यावर गहन विचार करायला पाहिजे असे न्यायमूर्ती नझीर यांनी सांगितले.

न्यायालयाने काय म्हटले

1994 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने मशिदीमध्ये नमाज पठण हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही असे स्पष्टपणे म्हटले होते. या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी हा खटला सात सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपवावा अशी मागणी  याचिकाकर्त्यांनी केली होती, मात्र आज खंडपीठाने  घटनापीठाकडे खटला सोपविण्यास नकार दिला.

1994 मध्ये ज्यासंदर्भात निकाल दिला ते संदर्भ तपासले पाहिजेत. ते संदर्भ वेगळे होते. त्यामुळे आता अयोध्या प्रकरणाचा खटला टायटल सुटअंतर्गत भूखंडाचा वाद म्हणून पाहण्यात येणार आहे असे न्यायमूर्ती भूषण यांनी सांगितले.

प्रत्येक खटल्याचा निकाल ज्या परिस्थितीत दिला जातो त्यामागचे संदर्भ समजून घेतले पाहिजेत असे न्यायमूर्ती भूषण यांनी स्पष्ट केले.