
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
पांग्रड गावातील रेडेतळवाडी येथील नळपाणी योजना अपूर्ण असतानाही पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले आहे. या कामात भ्रष्टाचार झाला आहे. मात्र या कामाची चौकशी करून कारवाई करण्यास जिल्हा परिषद व कुडाळ तहसीलदार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ प्रवीण भास्कर मर्गज प्रसिद्धि पत्रकाद्वारे केला आहे.
कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावातील रेडेतळवाडी येथे २०१५ मध्ये नळपाणी योजनेचे काम करण्यात आले आहे. हे काम अर्धवट स्थितीत असल्याने आपण ५ जानेवारी २०१८ रोजी कुडाळ पंचायत समिती येथून माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता त्यात आपल्याला हे काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या माहिती तफावत आढळून आल्याने आपल ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन सम्बंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी हे काम अर्धवट आहे आम्ही त्यात फसवणूक केली आहे असे सांगितले. त्याचे आपल्याकडे फोन रेकोर्डिंगही आहे. त्यामुळे आपण ९ एप्रिल २०१८ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे या कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांनी कोणतीही चौकशी केली नाही. त्यामुळे आपण कुडाळ तहसीलदार यांच्याकडे या कामाच्या चौकशी ची मागणी २४ मे २०१८ रोजी केली. हा मागणी केली असता रेडेतळवाडी येथील अर्धवट नळपाणी योजनेचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळीचे फोटोही आपल्या कडे आहेत. मात्र एवढे पुरावे असताना आणि तक्रार अर्ज करूनही जिल्हा परिषद प्रशासन आणि कुडाळ तहसीलदार रेडेतळवाडी नळपाणी योजनेच्या कामाची चौकशी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप प्रवीण मर्गज यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.






























































