वीजचोरीप्रकरणी उद्योजकास एका वर्षाची कैद; दोन लाखांचा दंड

17

सामना ऑनलाईन, मुंबई

विजेची चोरी करणे सोलापूर जिह्यातील एका उद्योजकास चांगलेच महागात पडले आहे. बेकायदेशीरपणे वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज वापरल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने रवींद्र भंडारे या उद्योजकास दोषी ठरवत एक वर्षाची कैद आणि दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.

सोलापूर जिह्यातील अक्कलकोट एमआयडीसीत रवींद्र भंडारे यांचा कारखाना आहे. विजेच्या मागणीपेक्षा त्यांचा कमी वीज वापर होत असल्याने महावितरणच्या भरारी पथकाने 2014मध्ये धाड टाकत तपासणी केली होती. त्या वेळी भंडारे यांनी वीज मीटरचे सील तोडून त्यात छेडछाड केल्याचे निदर्शनास आले होते. तसेच मीटरची गती कमी केली होती. त्या पार्श्वभूमीवर महावितरणने 46 हजार 860 रुपयांची वीजचोरी केल्याचा ठपका ठेवत वीज कायदा 2003नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार संबंधिताने वीजचोरीची रक्कम भरली, मात्र हॉर्स पॉवरप्रमाणे आकारलेले दंडाचे दोन लाख रुपये भरण्यास नकार दिला होता. या प्रकरणावर सोलापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी भंडारे यांना न्यायालयाने दोषी ठरवत एक वर्षाची कैद आणि दंडाची शिक्षा सुनावली.

आपली प्रतिक्रिया द्या