तळेगाव येथील शाळेचा वर्ग पेटवला: 95 हजारांचे साहित्य जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

अहमदपुर तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रयोग शाळा व ग्रंथालय असलेला वर्ग एका अज्ञात माथेफिरुने 8 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पेटवून दिल्याची घटना घडली असून यात एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

तळेगाव येथे पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून चांगले शिक्षक व ग्रामस्थांच्या सहकार्याने दिवसेंदिवस शाळेचा दर्जा सुधारत आहे, असे असताना अज्ञात माथेफिरु लोकांनी या शाळेची वर्ग खोली पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. या शाळेच्या जवळपास कांही खासगी संस्था असल्याने त्यांच्या मार्फत हे कृत्य केले असल्याचा अंदाज गावकरी व्यक्त करत आहेत. या आगीत प्रयोग शाळेतील साहित्य, कागदपत्रे, व इतर शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले आहे. एकूण एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मुख्याध्यापक एस.व्हि. राठोड यांच्या फिर्यादी वरून अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.