पाणीटंचाईमुळे मराठवाड्यात पाच हजार शाळांमध्ये खिचडी कोरडीच

सामना प्रतिनिधी । बीड

मृग नक्षत्र संपत आले आहे. तरी निसर्गाची आणि वरुणाराजाची कृपा झालेली नाही. मराठवाड्यात सर्वत्र भीषण पाणीटंचाई आहे. या भीषण पाणीटंचाईच्या काळातच शाळा सुरू झाल्याने तब्बल पाच हजार शाळांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याअभावी जनतेचे हाल होत आहे. पाण्याचे टँकर आले की, संपूर्ण गाव टँकरमागे धावत आहे. अशी विदारक परिस्थिती असताना शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेत विद्यार्थाना पिण्याचे पाणीही मिळत नाही. शालेय पोषण आहारात खिचडी शिजविण्यासाठी पाणीच नसल्याने दोन दिवसांपासून शाळेत विद्यार्थांचा खाऊ शिजलाच नाही. पैसे देऊनही पाणी मिळत नसल्याने शालेय प्रशासन हतबल झाले आहे. दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात पाऊस पडेपर्यन्त शाळांच्या सुट्टीचा कालावधी वाढवण्याची मागणी होत आहे. पाच हजार शाळांमध्ये उष्णतेचे आणि पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत.

महानगरातील विद्यार्थी नजरे समोर ठेवुन शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, पालकांना, व शालेय शिक्षण समितीला बसत आहे. ग्रामीण भागात हंड़ाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात आलेल्या पाण्याच्या टँकरमागे हंडाभर पाण्यासाठी धावावे लागते. अनेक गावात पाण्यामुळे स्थलांतर झाले आहे. पिण्याच्या आणि सांडपाण्याची व्यवस्था लागेना म्हणून वाड्या वस्तीवर अजूनही शुकशुकाट आहे. अशा भीषण टंचाईच्या परिस्थिती मध्ये शाळा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाची तीव्रता अजूनही कमी झालेली नाही. विद्यार्थ्यांना उष्माघात होण्याची शक्यता आहे. जिल्हापरिषदेच्या एकाही शाळेत पंख्याची व्यवस्था नाही. तापमान अजूनही 38 अंशाच्या पुढे आहे. शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याचेही पाणी मिळत नाही. शालेय प्रशासन पैसे देउन पाणी विकत घेण्याची तयारी दर्शवत असतानाही पाणी मिळत नसल्याचे प्रशासन हतबल झाले आहे. दोन दिवसांपूर्वी शाळा सुरू झाल्या. मात्र, पाण्याअभावी शालेय पोषण आहार शिजलाच नाही. कोरड्या खिचडीमुळे विद्यार्थी निराश झाले आहेत. उन्हाळी सुटी वाढवून दिपावलीच्या सुट्या कमी करण्याची मागणी होत आहे. दुष्काळाने होरपळलेल्या गावात महागाई वाढल्याने शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यातच शाळा सुरू झाल्याने मुलांना शाळेचे दप्तर, गणवेष आणि वह्या, पुस्तके कशी आणायची असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.