फीवाढीविरोधात पालकांचा 15 फेब्रुवारीला मोर्चा,शिक्षण आयुक्त कार्यालयावर धडक

300

दरवर्षी वाढणाऱया शाळांच्या फीविषयी पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. फीवाढीला विरोध करण्यासाठी तसेच शुल्क नियंत्रण कायदा 2018 रद्द करण्याच्या मागणीसाठी 15 फेब्रुवारीला राज्यातील पालक शिक्षण आयुक्त कार्यालयावर धडक देणार आहेत.

प्री-स्कूल, प्राथमिक तसेच माध्यमिक शाळादेखील अचानक फीवाढ करतात. त्यासाठी कोणतीही प्रक्रिया पाळली जात नाही. तसेच फी नियंत्रण कायदा 2018 हादेखील पालकांच्या विरोधातला असल्याने तो रद्द करण्याची मागणी इंडिया वाईड पॅरेंटस् असोसिएशनने केली आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या काही रखडलेल्या मागण्यासाठी असोसिएशनच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

खासगी शाळा एनसीईआरटीचा अभ्यासक्रम फॉलो करीत नाहीत. विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाबाहेरील उपक्रमांची सक्ती केली जाते, पालकांच्या तक्रारींवर शिक्षण विभागातील अधिकारी कार्यवाही करीत नाहीत. पाठय़पुस्तके शाळेतून किंवा शाळेने सांगितलेल्या दुकानदाराकडून विकत घेण्याची सक्ती केली जाते. याशिवाय मुंबई, पुणे याशिवाय अन्य काही विभागातील शिक्षण उपसंचालकाचे पद प्रभारी आहेत. अशा तक्रारींचे निवेदन शिक्षण आयुक्तांना दिले जाणार आहे. या मोर्चात विद्यार्थी पालकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या