कोरोनाच्या नवीन केसेसमध्ये सातत्याने घट, नवीन वर्षात मुंबईत शाळेची घंटा वाजणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई आणि परिसरात कोरोनाच्या नवीन केसेसमध्ये सातत्याने घट होत आहे. त्यामुळे नवीन वर्षात 1 जानेवारीपासून मुंबईसह ठाणे, रायगड जिह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. शाळा सुरू करण्याविषयी महापालिकेसह शाळा, प्राध्यापक आणि पालकांनीही सकारात्मकता दर्शविली आहे.

मुंबई, ठाणे, पालघर आणि काही अन्य जिल्हे वगळता इतर ठिकाणी 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत राज्यभरातील सुमारे 10 लाख विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. मुंबई परिसरात कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक असल्याने या भागातील शाळा सुरू झाल्या नव्हत्या. कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या भीतीमुळे पालकांसह शिक्षकही शाळा सुरू करण्यास तयार नव्हते. मात्र आता कोरोनाचा प्रभाव फारच कमी झाला आहे. नवीन केसेसमध्ये होत असलेली घट पाहता शाळा सुरू करण्यास तयारी दर्शविण्यात आली आहे.

शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले, ‘एमएमआर परिसरात कोरोनाची नवीन प्रकरणे आता कमी झाली आहेत. प्रशासनाचे कोरोनावर आता चांगले नियंत्रण असून 1 जानेवारीपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही. तर पालक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा अरुंधती चव्हाण यांनी सांगितले, ‘सहा महिन्यांपासून घरी ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी आता कंटाळले आहेत. शाळा सुरू झाल्यास विद्यार्थीही अभ्यासात सजगता दाखवतील.’

परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच निर्णय

मुंबईत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र परिस्थितीचा आढावा घेऊनच निर्णय घेतला जाईल असे महापालिकेच्या अधिकाऱयांनी सांगितले. पुढील आठवडय़ात शाळा सुरू होणार की नाही याविषयी स्पष्टता येणार असून सध्या तरी कोणत्या निष्कर्षापर्यंत येणे योग्य नसल्याचेही या अधिकाऱयाने सांगितले.