
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या शाळांची घंटा सोमवारी वाजली. सोमवारपासून ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावी आणि शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारने शाळांना परिपत्रक काढून शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात केले होते.
या पार्श्वभूमीवर केंद्र शाळा साखरपा नं.1 येथे सर्व विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. संगमेश्वर पंचायत समितीचे सभापती जयसिंग माने यांच्या मुख्य उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. यावेळी सभापती माने यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना चालू शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
कोरोना नियमांचे पालन करून सर्वांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहन सभापतींनी केले. तसेच पूर्वीप्रमाणे शाळेतील उत्साही वातावरण कायम राहिले पाहिजे असेही सांगितले. यावेळी सभापती माने यांच्या समवेत अजय सावंत, प्रवीण जोयशी, दिव्या भाटकर (मुख्याध्यापक) ,स्नेहल यशवंतराव (पदवीधर शिक्षिका) आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापिका भाटकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे दीड वर्षानंतर पुन्हा एकदा शाळेत सर्व विद्यार्थी आल्याने आनंद झाल्याचे म्हणाल्या. कोरोना नियमांचे पालन करून शाळा व्यवस्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले.



























































