
बृहन्मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रात कार्यरत असलेल्या सुमारे 399 खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील सुमारे 4500 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांना मुंबई महापालिका प्रशासनाकडून अद्याप सातवा वेतन आयोग लागू केलेला नाही. याच्या निषेधार्थ जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेच्या नेतृत्वाखाला खासगी शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मंगळवार, 22 मार्च रोजी आझाद मैदानात मार्चा काढणार आहेत.
सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून अमलात आला असून पालिकेने आपल्या कर्मचाऱयांना 1 जानेवारी 2019 पासून लागू केला. मात्र महापालिकेच्या खासगी अनुदानित मराठी प्राथमिक शाळांतील शिक्षक व कर्मचारी यांच्याबाबतीत मात्र सातत्याने दुजाभाव केला जात आहे.
त्यामुळे कर्मचाऱयांमध्ये मोठी नाराजी आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी होणाऱया महानगरपालिका निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी मनपा प्रशासन व राज्य शासन यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधून हा प्रश्न निकाली लावावा यासाठी आता समस्त शिक्षक व कर्मचारी वर्ग एकवटून भव्य मोर्चा काढणार आहेत.
























































