अहिल्यानगर जिल्ह्यात मतदान केंद्र असलेल्या शाळांना 19,20 डिसेंबरला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर ज्या शाळांमध्ये मतदान केंद्रे आहेत, अशा शाळांना शुक्रवार 19 डिसेंबर आणि शनिवार २० डिसेंबर २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील संगमनेर, शिर्डी, राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, जामखेड व श्रीगोंदा (राहाता वगळून) तसेच कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी या नगरपरिषदा आणि नेवासा नगरपंचायत या ठिकाणी २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी मतदानाच्या एक दिवस अगोदर, म्हणजेच १९ डिसेंबर रोजी केंद्रांवर पोहोचणार आहेत. त्यामुळे निवडणूक कामात अडथळा येऊ नये, यासाठी संबंधित शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत संबंधित मतदान केंद्रे (शाळांच्या इमारती) निवडणूक कामासाठी उपलब्ध राहतील तसेच तेथे पिण्याचे पाणी व वीज व्यवस्था सुरळीत राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले आहेत.