
>> शैलेश माळोदे
डॉ. मंजू शर्मा. आपल्या देशातील प्रसिद्ध जैवतंत्रज्ञ. विज्ञानाचा उपयोग महिला, कुपोषित बालके आणि आदिवासी यांच्यासाठी प्रामुख्याने व्हायला हवा. यासाठी त्या आग्रही आहेत.
देशाची पोषणविषयक आणि रोजीरोटीशी निगडीत सुरक्षितता आणि त्यासंबंधीची आव्हानं ही महत्त्वाची असून तरुण वैज्ञानिकांनी याबाबत सतत पुढे राहून सजगतेनं आणि संवेदनशीलतेनं विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासात आपली भूमिका बजावायला हवी. विज्ञान आणि तंत्रज्ञान शेतकऱयांच्या विशेषतः दुर्बळ आणि अल्पभूधारकांच्या आणि महिलांच्या विशेषतः आदिवासीबहुल भागातील महिलांच्या उपयोगासाठी वापरलं गेलं पाहिजे.’’ पद्मभूषण डॉ. मंजू शर्मांनी हे उद्गार काढले होते ते नवीन पिढीतील वैज्ञानिकांसमोर महत्त्वाची आव्हानं कोणती असं विचारल्यावर. डॉ. मंजू शर्मा या देशाच्या एक प्रसिद्ध जैवतंत्रज्ञ असून कृषी क्षेत्रातील जैवतंत्रज्ञान किती उपयुक्त असेल आणि त्याचा वापर किती सावधानतेनं करावा याबाबत त्यांनी खूपच महत्त्वाची भूमिका देशाची धोरणं आणि त्यावरील अंमलबजावणी करताना बजावली आहे. कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका भूक, कुपोषण, आरोग्य हवामान बदल यासारख्या शाश्वत विकासाच्या लक्ष्यांमधील महत्त्वाच्या प्रश्नांसाठी अत्यंत आवश्यक आहे, असं त्यांनी आग्रहीपणे सांगितले.
13 डिसेंबर 1940 रोजी जन्मलेल्या डॉ. मंजू शर्मा या बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक महासना पं. मदनमोहन मालवीय यांच्या नात असून त्या केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव होत्या. त्यांनी देशातील विविध वैज्ञानिक संशोधन आणि धोरणात्मक निर्णय घेणाऱया संस्थांमध्ये प्रशासकीय जबाबदाऱयादेखील निभावल्या आहेत. देशातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनॉलॉजी, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ प्लांट जिनोम रिसर्च, तसेच लखनौ आणि मदुराई येथील बायोमास रिसर्च सेंटर्स आणि सेंटर फॉर डीएनए फिंगर प्रिंटींग ऍण्ड डायग्नॉस्टिक्ससहित अनेक संस्थांच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लखनौ विद्यापीठातून बिरबल सहानी स्मृती सुवर्णपदकासहित प्रथम क्रमांकांत उत्तीर्ण होत त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर 1946 साली त्याच विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केल्यावर अमेरिकेतील पडर्य़ू विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल संशोधक म्हणून ए. कार्ल लिओपाल्ड आणि रिचर्ड हॉल यासारख्या वैज्ञानिकांबरोबर काम केले.
‘‘इथेरल सॉइलचा वापर करून मलेशियात व्यापारिकदृष्टय़ा रबर उत्पादनात उपयुक्त ठरेल अशा रितीने लॅटेक्स संशोधन केले. त्यानंतर वनस्पतीमधील माझ्या इडिओ ब्लास्ट विषयक संशोधनामुळे मला कोपनहेगन विद्यापीठात व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आलं. डेहराडून इथल्या वन संशोधन संस्थेत लाकूड मोठय़ा प्रमाणात असलेल्या वनस्पतींविषयी काम करून लाकडाच्या टणकपणाचा सिलिका असण्याशी असलेल्या संबंधाबाबत संशोधन केले.’’ असं त्यांनी आपल्या संशोधनविषयक कारकिर्दीच्या सुरुवातीविषयी सांगितले. त्यानंतर दिल्लीला आल्यावर त्या हिंदुस्थानच्या वैद्यकीय संशोधन परिषदेत संशोधन अधिकारी म्हणून रुजू झाल्या आणि त्यांनी हिंदुस्थानच्या वैद्यकीय वनस्पतींविषयक पुस्तकांच्या सहलेखिका म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. 1974 मध्ये त्या हिंदुस्थान सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून रुजू झाल्या. 1990 मध्ये वरिष्ठ सल्लागार आणि 1996 साली त्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव बनल्या. आपली सचिवपदाची कारकीर्द पूर्ण झाल्यावर त्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सल्लागार म्हणून 2004 पासून कार्य करू लागल्या. त्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, देशातील जैवतंज्ञविषयक संशोधन बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी बायोटेक कॉन्सोर्शियम इंडिया लि. या सार्वजनिक-खासगी भागिदारीची स्थापना त्या काळात करण्यात आली. 2006 मध्ये मी पुरी फाऊंडेशन फॉर एज्युकेशनच्या सहकार्यानं मी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ऍडव्हान्स्ड रिसर्च स्थापन करून वनस्पती विज्ञान, मानवी आरोग्य, जैवरेणवीय वैद्यक आणि बायो इन्फॉर्मेटिक्समधील संशोधन आणि उच्च शिक्षण देण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. 2012 पर्यंत मी अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक म्हणून काम केलं.
1980 ते 83 या सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी महिलांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी एक प्रकरण तयार करण्याचं काम सुरू केलं तेव्हा डॉ. शर्मा यांनी योजनेच्या दस्ताऐवजासाठी एक रिपोर्ट तयार केला. हा याबाबतचा पहिला प्रयत्न होता. वयाच्या 80 व्या वर्षात नुकतंच पदार्पण केलेल्या डॉ. मंजू शर्मा जैवतंत्रज्ञानाचा वापर करून वनस्पतीशास्त्र्ााद्वारे देशातील विविध प्रश्न सोडविण्याच्या कामी तरुणांना मदत आणि मार्गदर्शन करण्याच्या कामी सदैव तत्पर असतात. तरुणांपुढे काम करण्यासाठी खूप संधी आहेत. फक्त त्यावर विचारीपणे झोकून देत काम करायला हवे. त्याकरिता विज्ञान आहेच. फक्त गरज आहे. खुल्या मनानं वाटचाल करण्याची, असं डॉ. मंजू शर्मा म्हणतात. त्यात काय खोटं आहे? तरुणांनी विचार करायला हवा, असं नाही वाटत आपल्याला?



























































