पार्श्वभागानेही श्वास घेता येणार? शास्त्रज्ञांनी लावला नवीन शोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाक हे आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे. कारण शरीराला आवश्यक असलेला प्राणवायू ओढून घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे हे महत्त्वाचं काम करणाऱ्या अवयवांपैकी एक ते एक आहे. आतापर्यंत शरीररचनेनुसार, फक्त नाकावाटेच श्वास घेता येत होता. पण, आता शरीराच्या अन्य एका मार्गाद्वारे देखील श्वास घेता येऊ शकतो, असा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.

क्लिनिकल अँड ट्रान्सलेशनल रिसोर्स अँड टेक्नोलॉजी इनसाईट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. शास्त्रज्ञांनी या प्रयोगात डुक्कर आणि उंदरांचा वापर केला. तसंच काही प्रयोग कासवांवरही करण्यात आले. या जनावरांच्या आतड्यांना घासून थोडा पातळपणा आणला गेला. त्यामुळे म्युकोसल लाईन नावाचा अंतर्गत अवयवांमधील एक स्तर पातळ होऊ शकेल.

या कृतीमुळे रक्तप्रवाहाचा वेग वाढला आणि त्यांच्या प्रवाहात कोणताही अडथळा उत्पन्न झाला नाही. त्यानंतर त्यांना प्राणवायूचा कमी पुरवठा असलेल्या खोलीत ठेवण्यात आलं. त्या निरीक्षणात शास्त्रज्ञांना असं लक्षात आलं की ज्या जनावरांच्या आतड्यांना घासून त्यांचा पोत पातळ करण्यात आला होता, ती जनावरं सुमारे 18 मिनिटं जिवंत होती. पण, ज्या जनावरांच्या आतड्यांवर काहीही प्रयोग केलेला नव्हता, ते प्राणी अवघ्या 11 मिनिटात मरण पावले.

कारण, हे प्राणी त्यांच्या गुदद्वाराने श्वासोछ्श्वास करत होते, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी नोंदवला आहे. तसंच या प्राण्यांना गुदद्वाराने प्राणवायू दिला गेला, तेव्हा त्यापैकी 75 टक्के जनावरं जिवंत राहिली होती. आता डुकरं, उंदीर आणि कासवांनंतर जर हा प्रयोग मानवावर यशस्वी झाला तर मनुष्य देखील गुदद्वाराने श्वास घेऊ शकेल. त्यामुळे त्याच्यावर उपचार करताना त्याला प्राणवायूचा दुप्पट पुरवठा करता येईल. मात्र, अद्याप त्यावर संशोधन सुरू असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.