नांदेड जिल्ह्यात ‘स्क्रब टायफीस’ या रोगाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

विदर्भात अनेक जणांचे बळी घेतल्यानंतर ‘स्क्रब टायफीस’ अतिशय गंभीर आजार नांदेड जिल्ह्यात झपाट्याने पसरत आहे. हदगाव तालुक्यातील लोहा मांडवा येथील वायफना प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या एकूण पाच संशयित रुग्णांपैकी ‘स्क्रब टायफीस’ या गंभीर आजाराची लागण झाली असल्याच्या वृत्तास जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून दुजोर दिला जात आहे.

हदगाव तालुक्यातील वायफणा येथील एक मांडवा (लोहा) येथील तीन रुग्ण शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची लक्षणे बघून विभागास माहिती पुरविण्यात आली होती. तर काही दिवसांपूर्वीच ‘स्क्रब टायफीस’ नावाच्या गंभीर आजाराने नागपूर जिल्ह्यातील 20 व्यक्तींचा बळी घेतला असून राज्यात देखील काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर आरोग्य विभागाने सर्व तपासणी करून त्यांचे नमुने शासकीय रुग्णालयाच्या जीवशास्त्र विभागाकडे पाठविले. त्यानंतर चार जणांना ‘स्क्रब टायफीस’ ची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. यापूर्वीच आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी आरोग्याधिकारी यांना ‘स्क्रॅब टायफीस’ या आजारावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविन्यासाठी सूचना दिल्या आहेत

या आजाराची प्राथमिक लक्षणे ताप, डोकेदुखी, हात पाय दुखणे, मळमळ, ओकारी, शुद्ध हरपणे, तोल जाणे अशी असतात. पूर्वी ‘स्क्रॅब टायफीस’ रुग्णांच्या टेस्ट या नागपूर, वर्धा, अकोला, या ठिकाणाहून कराव्या लागत होत्या.  या आजाराची गंभीरता लक्षात घेता नांदेडच्या शासकीय रुग्णालयात सर्व तपासणी व अहवालासाठी शासकीय पातळीवर तरतूद करण्यात आल्यानंतर रुग्णालयामार्फत तपासणीचा अहवाल मागविण्याची ही पहिलीच वेळ आहे. परंतु अधिकारी रजेवर असल्याने येण्यास विलंब होत असला तरी रुग्णांच्या तपासणीतून पाच पैकी चार रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निश्चित झाले आहे. अशी माहीती जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.