मालवणात अनधिकृत वाळू रॅम्प उध्वस्त; दोन अनधिकृत झोपड्याही हटवल्या

6672

मालवणात अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार अजय पाटणे यांनी केलेल्या कारवाईत बांदिवडे व कोईळ येथील दहा अनधिकृत वाळू रॅम्प जमीनदोस्त करण्यात आले. तहसीलदार पाटणे यांनी स्वतः कारवाईत सहभाग घेत वाळू रॅम्प उध्वस्त केले. महसूलचे पथक येत असल्याची कुणकुण लागताच खाडीपात्रातून होडीसह कामगारानी पोबारा केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू लिलाव प्रक्रिया रखडल्याने अनधिकृत वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मालवण तालुक्यातील खाडीपात्रांमध्ये वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी तहसीलदारांकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर तहसीलदार अजय पाटणे यांनी मोहीम हाती घेत बांदिवडे, कोईळ या भागात धाड टाकली. यात तीन ठिकाणचे दहा वाळू रॅम्प जमीनदोस्त केले तर परप्रांतीय कामगारांच्या दोन झोपड्याही उध्वस्त करण्यात आल्या. ही कारवाई पाटणे यांच्या नेतृत्वाखाली डी. एस. सावंत, अरुण वनमाने, मंडळ अधिकारी केशव पोकळे, तलाठी धनंजय सावंत, कोतवाल सचिन चव्हाण आदींच्या पथकाने केली. कालावल खाडी बरोबरच कर्ली खाडी पात्रातही अनधिकृत वाळू उखनन सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महसूल प्रशासन आपला मोर्चा कर्ली खाडीत वळवणार असल्याची माहिती मिळाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या