
सामना ऑनलाईन, मुंबई
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशन कालावधीत शासनाच्या सर्व विभागाच्या सचिवांना मुख्यालयात हजर राहावे आणि आवश्यकता असेल तेव्हा विधिमंडळाच्या गॅलरीत उपस्थित राहण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी दिले.
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन 25 फेब्रुवारीपासून मुंबईत होणार आहे. विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत विविध चर्चांमध्ये महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होत असतात. राज्य सरकारला त्याचे तातडीने उत्तर द्यावे लागत असते. तसेच पुढील कार्यवाहीदेखील करावी लागत असते. अनेकदा संबंधित मंत्री सभागृहात नाही म्हणून गदारोळ होत असतो. संबंधित मंत्र्याला तातडीने बोलाविण्यात येत असते. त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारीदेखील उपस्थित असावेत यासाठी हा नियम करण्यात आला आहे. अधिवेशन कालावधीत ज्या दिवशी त्यांच्या विभागाशी संबंधित कामकाज असेल तेव्हा त्या विभागाच्या सचिवांना सभागृहाच्या अधिकारी गॅलरीत उपस्थित राहावे लागणार आहे. सभागृहातील चर्चेची माहिती संबंधित मंत्री व राज्यमंत्र्यांना तत्काळ द्यावी लागणार आहे.
सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांना अधिवेशन कालावधीत मुंबईत उपस्थित राहावे लागणार आहे. मात्र अनिवार्य कारणास्तव जर मुंबईबाहेर जायचे असेल तर त्यांना मुख्य सचिव तसेच संबंधित मंत्र्याची पूर्वानुमती घ्यावी लागणार आहे. विधिमंडळात आमदारांनी उपस्थित केलेल्या बाबी विहित कालावधीत निकाली काढाव्यात व त्या प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याची सूचना मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी सचिवांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत आधीच दिल्या आहेत.
…तर सचिवावर कारवाई
विधिमंडळात उपस्थित करण्यात आलेल्या बाबीवर जर योग्य कार्यवाही झाली नाही. तसेच कालमर्यादा पाळली गेली नाही तर संबंधित सचिवावर कडक कारवाई करण्याचा इशाराही दिनेश कुमार जैन यांनी दिला आहे.































































