सूर्यनारायण तापला, बिहारमध्ये वाढत्या उष्णतेमुळे कलम 144 लागू

सामना ऑनलाईन । पाटणा

देशभरात सूर्यदेवाच्या उष्णतेने हाहाकार उडवला आहे. बिहारला याचा सर्वाधिक फटका बसला असून उष्मघाताच्या वाढत्या प्रभावामुळे प्रशासनाने बिहारमध्ये कलम 144 लागू केला आहे. असे घडण्याची ही पहिलीच वेळ आहे, की कोणत्याही राज्यात वाढत्या उष्णतेमुळे कलम 144 घोषित करावे लागले आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकड्यानुसार बिहारमध्ये उष्मघाताने आतापर्यंत 78 लोकांचे बळी घेतले आहेत. राज्यातील उष्णतेने जास्त प्रभावित असलेल्या गया, नवादा आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये सरकारने जाहिरात करून सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत बाहेर पडू नये असे निर्देश दिले आहेत. तसेच आवश्यक काम असेल तरच दुपारच्यावेळी घराबाहेर पडावे असे आवाहन लोकांना केले आहे.

उष्मघाताने मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 50 हून अधिक वय असलेल्या लोकांचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासनाने तापमान सामान्य होईपर्यंत जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू केला आहे आणि यादरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सर्व दुकान आणि बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्देश प्रशासनाद्वारे देण्यात आले आहेत.

मगध विभागाचे आयुक्त पंकज पाल यांनी एनएमसीएच रुग्णालयात जाऊन उष्मघाताने पीडित रुग्णांच्या परिस्थीतीची पाहणी केली. आणि ते म्हणाले की, ‘या कठीण काळात सरकार मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांसोबत सदैव उभी आहे’.