Seema Dev – ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Dev) यांचे 24 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. दीर्घ आजारामुळे गेले अनेक दिवस त्या अंथरुणाला खिळून होत्या. अभिनेत्री सीमा देव आणि त्यांचे पती रमेश देव मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेले कलाकार आहेत. सीमा देव यांनी राजा परांजपे दिग्दर्शित ‘जगाच्या पाठीकर’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

सीमा देव यांना अल्झायमरने ग्रासले होते. त्यांचा मुलगा, अभिनेता अजिंक्य देव यांनी ट्विटरकरून याबाबतची माहिती दिली होती. ‘माझी आई श्रीमती सीमा देव अल्झायमरच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी आम्ही संपूर्ण देव कुटुंबीय प्रार्थना करत आहोत. तिच्यावर प्रेम करणाऱया महाराष्ट्रातील चाहत्यांनीदेखील त्या लवकर बऱया होण्यासाठी प्रार्थना कराव्यात,’ असे ट्विट अजिंक्य देव यांनी त्यावेळी केले होते.

एव्हरग्रीन लव्हस्टोरी…

रमेश देव यांच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी हळहळलीय. वयाची नव्वदी ओलांडल्यानंतरही ‘एव्हरग्रीन’ आयुष्य जगलेल्या रमेश देव यांचे पत्नी सीमा देव यांच्याशी असलेल्या प्रेमाच्या नात्यात वृद्धत्वातही तोच गोडवा होता. पूर्वाश्रमीच्या नलिनी सराफ अर्थात अभिनेत्री सीमा देव आणि रमेश देव यांचे 1962 साली लग्न झाले. दोघांनी आपले वैवाहिक आयुष्य सुखनैव जगतानाच अनेक चित्रपटांत सोबत दिली. दोघांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री कायमच चांगली राहिली. त्यांचे एकमेकांवरचे जिवापाड प्रेम चित्रपटसृष्टीतील ‘एव्हरग्रीन लव्हस्टोरी’ म्हणून संस्मरणीय राहणार आहे.

रमेश देव आणि सीमा देव यांच्या वयात 12 वर्षांचा फरक. रमेश देव यांनी 1950 मध्ये मराठी चित्रपटापासून आपल्या करीअरची सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला छोटय़ा भूमिका पडद्यावर साकारल्या. पुढे अल्पावधीतच त्यांना चित्रपटात मुख्य भूमिकाही मिळत गेल्या. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांत मुख्य भूमिका केल्या. हिंदी चित्रपटांतही त्यांच्या अभिनयाला चांगला वाव मिळत होता. याचवेळी दुसरीकडे चित्रपटसृष्टीत नलिनी सराफ हे नाव नावारूपाला येत होते. त्यांनी चित्रपटांसाठी आपले नाव सीमा असे ठेवले होते. सीमा देव यांनी 1960 मध्ये ‘जगाच्या पाठीवर’ या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटात रमेश देव यांनीसुद्धा भूमिका साकारली होती. या जोडीमुळे ‘जगाच्या पाठीवर’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. हा चित्रपट ’ब्लॉकबस्टर’ ठरला.

रमेश देव आणि सीमा देव यांचे एकमेकांवर प्रेम जडले ते 1962 मध्ये. या वर्षात प्रदर्शित झालेल्या ‘वरदक्षिणा’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले. येथे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांनी आणखी विलंब न करता त्याच वर्षी लग्न केले. 2013 मध्ये या जोडीच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाली. यंदा या जोडीने लग्नाचा 60 वा वाढदिवस साजरा केला होता. रमेश देव अखेरपर्यंत आपल्या लाडक्या पत्नीसाठी भेटवस्तू घ्यायचे. त्यातून त्यांचे पत्नीवरील निस्सीम प्रेम वेळोवेळी प्रकट व्हायचे.