शेवगावात वाळूमाफियाचा महिला ग्रामसेवकावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sand-mafia
प्रातिनिधिक फोटो

शेवगाव तालुक्यातील प्रभू वडगाव येथे ग्रामसेविका संचिता दळवी यांच्यावर वाळूमाफियाने हल्ला केला. यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत. यावेळी त्यांचे मंगळसूत्र गहाळ झाले आहे. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रभू वडगाव येथे ग्रामसेविका संचिता दळवी यांना ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत दत्तात्रय जायभाय हा अवैध वाळूउपसा करीत असल्याचे दिसले. त्यांनी त्याला विचारणा करून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, जायभाय यांनी शिवीगाळ करीत त्यांना मारहाण केली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत त्यांचे मंगळसूत्र गहाळ झाले.

संचिता दळवी यांनी तत्काळ तहसीलदारांना फोनवरून सदर घटनेची माहिती दिली. तोवर जायभाय चोरीच्या वाळू व ट्रक्टरसह पळून गेला. गावातील काही प्रतिष्ठतांनी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दळवी यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सायंकाळी उशिरा शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्यासह इतर कायदा कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे.