सेलू तालुक्यातील बागायतदार व शेतकऱ्यांना अनुदानातून वगळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे सेलू तालुक्यात शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. याची दखल शासनस्तरावर घेण्यात आली असून सरसकट पंचनामे करून कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी 8 हजार व फळबागासाठी 18 हजार रूपये अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र सेलू तालुक्यातील फळबागायतदार शेतकऱ्यांना या अनुदानातून वगळण्यात आले असल्याचे उघड झाले आहे.

सेलू तालुक्यात ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस, संत्री, मोसंबी लिंबू आधी पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यानच्या काळात फळबागांना नेमका फुलोरा लागला होता. तर काही शेतकऱ्यांनी हस्ताचा बहार ठेवलेला होता. ती लहान लहान फळे गळून पडली, पानझड झाली, झाडे पिवळी पडली. पावसामुळे डायबॅक नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन फळबागांचे मोठे नुकसान झाले. प्रशासकीय यंत्रणेसोबत राज्यस्तरीय, केंद्रस्तरीय पथक नुकसानीची पाहणी करून गेले.

पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकाचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. कोरडवाहू पिकांसाठी 9 हजार रुपये व फळबागासाठी 18 हजार रूपये तातडीची मदत जाहीर करण्या आली. मात्र सेलू तालुक्यात फळबागायतदार शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे निवेदन निपाणी टाकळी येथील शेतकऱ्यांनी दिले आहे. निवेदनावर प्रभाकर गिराम, गुलनाद मुखीद, दिनकर उबाळे, रामेश्वर गिराम, रमेश गिराम, ज्ञानेश्वर उबाळे, सखाराम उबाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.