‘लालपरी’ धावली, सेलू बस स्थानकातून परराज्यातील नागरिकांना घेऊन चार गाड्या रवाना

898

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन व संचारबंदीमुळे अडकून पडलेल्या प्रत्येक नागरिकांना घरी जाण्याची ओढ लागलेली आहे. शहरातील विविध जिनींग व मिलमध्ये काम करणाऱ्या 82 नागरिकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी प्रशासनाने मोफत व्यवस्था केली असून, यासाठी पाथरी आगाराच्या  चार एसटी गाड्या सेलू बस स्थानकातून सोमवार 11 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता मध्यप्रदेशच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत. यावेळी प्रशासनाच्यावतीने सेलूचे उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश एकबोटे, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

परराज्यातील मजूर व नागरिक घरापासून कोसो दूर अडकून पडलेले आहेत, त्या प्रत्येकाला घरी जाण्याची ओढ निर्माण झाल्यामुळे प्रत्येक जण खासगी वाहन, दुचाकी, सायकल एवढेच नव्हे तर काही पायी आपल्या गावाकडे मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे शासनाने अशा सर्व नागरिकांना मोफत एसटी गाड्यांची व्यवस्था केली आहे. सेलु शहरात मध्यप्रदेशातील खरगोन, खंडवा, बडेवण, आदी ठिकाणाहुन  मजूर शहरातील मधुसूदन, स्वस्तिक, बीबीसी, भगीरथ, इत्यादी जिनिंगवर काम करत होते. त्यामुळे ते सर्व मजुर अडकून पडले होते. ही परिस्थिती केव्हा बदलेल, घरी कधी जाता येईल, या चिंतेत मजूर असल्याकारणाने प्रशासनाने त्यांच्यासाठी स्वतंत्र चार एसटी गाड्यांची व्यवस्था करून प्रत्येक गाडीत 22 प्रवासी याप्रमाणे 82 नागरिकांना सोमवारी सकाळी साडेदहा वाजता, सेलू येथील बस स्थानक परिसरातून मध्यप्रदेशच्या दिशेने रवाना केले आहे. या चारही गाड्या औरंगाबाद, धुळे, शिरपूर, शेंदवा, मार्गे मध्यप्रदेशच्या सरहद्दीवर सर्व नागरिकांना सोडणार आहेत.

बस स्थानकात लालपरी
शहरातील बस स्थानकात मागील 21  मार्च पासून एसटी महामंडळाची एक गाडी आली नाही. तब्बल 50 दिवसांनी लालपरी बस स्थानकात आली. मध्यप्रदेशला जाणाऱ्या सर्व 82 नागरिकांची व बालकांची आरोग्य तपासणी करून सेलूकर यांच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी आठ चालकांना नाश्ता व मास्क देऊन काळजीपूर्वक परत येण्याच्या सुचना दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या