मुंबईत सेमी एसी लोकल धावणार, आयसीएफ घेणार ट्रायल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
AC local

मुंबई उपनगरीय मार्गावर पहिली वातानुकूलित लोकल सुरू होऊन चार वर्षे झाले तरी तिला प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. एसी लोकलचे तिकीट फर्स्ट क्लासपेक्षाही महाग असल्याने एसी लोकलकडे प्रवासी पाठ फिरवत आहेत. त्यामुळे एसी लोकलला साधे डबेही जोडले जाऊन सेमी एसी लोकल चालविण्याची मागणी होत होती. आता यासंदर्भात आयसीएफ कारखान्यात सेमी एसी लोकलच्या ट्रायल घेण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 12 फेऱया चालविण्यात येत आहेत. एसी लोकलच्या वापरासंदर्भात मे आणि जून महिन्यांत प्रवाशांचे सर्वेक्षण घेण्यात आले होते. त्यात 70 टक्के प्रवाशांनी एसी लोकल हवी असल्याचे मतदान केले होते. हा सर्व्हे रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. एसी लोकलला सहा डबे साधे आणि सहा डबे एसीचे किंवा नऊ डबे एसी आणि तीन डबे साधे अशा सेमी डिझाईनमध्ये चालविता येईल काय, यावर आयसीएफ कारखान्यात ट्रायल करून पाहिली जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.