हा खरा मराठी भाषा दिन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्यापण मराठी भाषा जपणाऱ्या बच्चे कंपनीला घेऊन ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘हा खरा मराठी भाषा दिन’ असे या कार्यक्रमाचे नाव असून रविवार, 17 फेब्रुवारीला दादरच्या शिवाजी मंदिरातील राजर्षी शाहू सभागृहात दुपारी 3 वाजता होईल.

अशोक मुळ्ये आणि शिवाजी मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गावदेवी, दादर, वाशी, पनवेल आदी भागातून सुमारे 50 विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील. संस्कृतमधून कथाकथन, अडीच वर्षांच्या मुलीचे काव्यवाचन, श्लोकपठण हे कार्यक्रमाचे वैशिष्टय़ असेल. इथे कोणतीही स्पर्धा नसली तरी उल्लेखनीय सादरीकरण करणाऱयास खास भेट दिली जाईल. वाशीच्या कॉन्व्हेंट स्कूलमधील शिक्षिका आदिती बर्वे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या निवेदनामध्ये कटाक्षाने मराठी भाषेचा वापर केला जाईल.

विस्मृतीत गेलेल्या कलाकारांचे संमेलन, दिवाळी अंकांच्या लेखकांचे संमेलन, बेड रिडन मुलांच्या पालकांसाठी स्नेहमेळा अशा सामाजिक आशय असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्यामुळ्ये यांची ही आणखी एक भन्नाट कल्पना आहे. मराठी नामशेष होतेय अशी ओरड होत असताना मराठीची जपणूक आणि संवर्धनामध्ये आपलाही वाटा असावा या हेतूने मुळ्येकाकांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय. स्वातंत्र्यवीर सावरकर (कॅडल) रोडवरील नाडकर्णी कुटुंबीयांची भेट ही कार्यक्रमाच्या आयोजनासाठी निमित्त ठरली. या कुटुंबातली नात जरी इंग्रजीत शिकत असली तरी घरात मराठीतच बोलायचे असा इथला दंडक आहे. शिवाय खास सांगायचे म्हणजे नाडकर्णी कुटुंबाच्या सूनबाई चिनी आहेत तरीही आपल्या लेकीशी त्या मराठीतच बोलतात. त्यांचीही या कार्यक्रमास उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.