ज्येष्ठ नागरिकाने तक्रार केल्यास विकासकाची नियुक्ती होणार रद्द, हायकोर्टात गृह विभागाचा जीआर, मुख्य अधिकाऱ्याला निर्णय घेण्याचे आदेश

पुनर्वसनात दिरंगाई करणाऱया विकासकाची ज्येष्ठ नागरिकाने तक्रार केल्यास त्याची नियुक्ती रद्द होऊ शकते. त्याचा निर्णय एसआरएच्या मुख्य अधिकाऱयाने घ्यावा, अशी तरतूद असलेला जीआर गृहनिर्माण विभागाने जारी केला आहे.

न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरती साठे यांच्या खंडपीठासमोर हा जीआर सादर झाला. ज्येष्ठ नागरिकाने विकासकाची तक्रार केल्यास एसआरएने त्याला तीन वेळा नोटीस द्यावी. तरीही पुनर्वसनात सुधारणा न झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱयाने या विकासकाची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, असे या जीआरमध्ये नमूद आहे. 63 वर्षीय मेहमूद अली हुसेन हाशमी यांनी थकीत भाडे मिळत नसल्याने ऍड. अल्ताफ खान यांच्यामार्फत याचिका दाखल केली. पुनर्विकासात नाहक त्रास होणाऱया ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी म्हाडा, एसआरएसारख्या प्राधिकरणात स्वतंत्र कक्ष स्थापन करा, असे आदेश गेल्या वर्षी राज्य शासनाला देण्यात आले होते.

 जीआरमध्ये एसआरएला दिले गेलेले महत्त्वाचे निर्देश

– एसआरए पुनर्वसनाबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करा.
– प्रकल्पावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण समिती स्थापन करा.
– उपमुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, विकासक व दोन ज्येष्ठ नागरिक या समितीत असावेत.
– पुनर्वसनात ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा असायला हव्यात.