
मुंबई पोलीस दलातील भ्रष्टाचाराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील गोवंडी भागातील शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव मधुकर देशमुख यांना मंगळवारी रात्री एसीबीच्या पथकाने 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार एका ट्रस्टचे संयुक्त सचिव असून एका कायदेशीर प्रकरणामध्ये मदत करण्याच्या मोबदल्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव देशमुख यांनी 5 लाख रुपयांची मागणी केली होती. सदर कामासाठी कमीत कमी 3 लाख रुपये द्यावेच लागतील अशी मागणी करण्यात आली. कारवाई दरम्यान तडजोडीअंती अडीच लाख रुपये स्वीकारण्याचे कबूल केले. तक्रारदाराने एसीबीकडे याची तक्रार केली. यानंतर एसीबीने तक्रारीची पडताळणी करत सापळा रचला आणि मंगळवारी रात्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव देशमुख यांना 1 लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
प्रकरण काय?
28 ऑगस्ट 2024 रोजी काही इसमांनी ट्रस्टच्या शाळेच्या गेटचे कुलूप तोडून शाळेच्या कार्यालयामध्ये जबरदस्ती प्रवेश केला आणि ट्रस्टवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तक्रारदाराने शिवाजीनगर पोलीस स्थानकात तक्रार केली होती. या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव देशमुख यांनी तक्रारदाराने 5 लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने विनवणी केल्यानंतर देशमुख यांनी कमीत कमी 3 लाख रुपये द्यावे लागतील, तर गुन्हा दाखल करू असे सांगितले. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. 13 मे 2025 रोजी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर देशमुख यांनी तडजोडीअंती अडीच लाख रुपये स्वीकारण्याचे कबूल केल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे सापळा रचत एसीबीने देशमुख यांना लाचेचा पहिला हप्ता 1 लाख रुपये स्वीकारताने रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
































































