
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवैध मुरूम उत्खनन रोखणाऱ्या महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना फोनवर दमबाजी केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता,” असं ते म्हणाले आहेत. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ते असं म्हणाले.
अजित पवार म्हणाले आहेत की, “आपल्या पोलीस दलाबद्दल तसेच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे.”
काय आहे प्रकरण?
सोलापूर जिह्यातील माढा तालुक्याच्या कुर्डू गावात रस्त्याचे काम सुरू असून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरूम उत्खनन करण्यात येत आहे. या उत्खननाविरुद्ध करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींवरून अंजली कृष्णा दोन दिवसांपूर्वी कुर्डू गावात गेल्या. या वेळी काही गुंडांनी तहसीलदार, तलाठी यांना लाठय़ाकाठय़ा दाखवत दमबाजी केली. या वेळी टीपर घेऊन गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. अंजली कृष्णा यांच्याशी त्यांचा वाद सुरू झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्यकर्ते बाबा जगताप यांनी आपल्या मोबाईलवरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला. अजित पवार यांनी गुंडांना झापण्याऐवजी पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना दम दिला आणि कारवाई थांबविण्याचे आदेश दिले. मात्र अंजली कृष्णा यांनी दाद न देता मला वरिष्ठांना उत्तर द्यावे लागते, असे सांगितल्याने अजित पवारांचा पारा आणखी चढला. यानंतर त्यांनी महिला अधिकारीला ‘इतनी डेअरिंग… मैं डायरेक्ट अॅक्शन लुंगा… मुझे कॉल करने को बोलती है…’, असं म्हणत दमबाजी केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.