
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ लादला. त्याचा परिणाम गुरुवारी शेअर बाजारावर दिसून आला. प्री मार्केट सेशनपासूनच बाजारात मोठी घसरण दिसून आली. प्री मार्केट सेशनमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 850 तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 350 अंकांनी घसरला होता. त्यामुळे बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजार कोसळण्याचा अंदाज अनेक तज्ज्ञांनी वर्तवला होता.
शेअर बाजार गुरुवारी सुरु होताच बाजाराने गुतंवणूकदारांना चांगलाच दणका दिला. सुरुवातीच्या काही मिनिटातच गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. ट्रम्प यांनी लादलेले कर आणि दंड 1 ऑगस्टपासून लागू होतील. त्यामुळे बाजारात आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्रीचा मोठा दबाव आहे. त्यामुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 4.42 लाख कोटींनी कमी झाले आहे. म्हणजेच बाजार सुरू होताच गुंतवणूकदारांचे 4.42 लाख कोटी स्वाहा झाले आहेत. सध्या सेन्सेक्स सध्या 570 अंकांनी म्हणजेच 0.70 टक्के घसरणीसह 80,911.86 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टी 160 अकांच्या म्हणजेच 0.70 टक्के घसरणीसह 24,703 . 30 वर व्यवहार करत आहे.
सेन्सेक्स बुधवारी 143.91 अंकांनी म्हणजेच 0.18 % वाढीसह 81,481.86 वर बंद झाला. तर निफ्टी 0.18% वाढीसह 24,855.05 वर बंद झाला. मात्र,गुरुवारी ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने काही मिनिटातच गुंतवणूकदरांचे 4.42 लाख कोटींचे नुकसान केले आहे. त्यामुळे आता गुतंवणूकदार धास्तावले असून बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.