सेवाग्राम विकास आराखडयातील 161 कोटीची कामे पूर्ण, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार ई-लोकार्पण

हिंदुस्थानसह संपूर्ण जगात शुक्रवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वर्धा, सेवाग्राम आणि पवनार येथे सेवाग्राम विकास आराखडया अंतर्गत झालेल्या विविध विकास व सुशोभीकरणाच्या कामांचे ई -लोकार्पण उद्या शुक्रवार दि. 2 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

सदर कार्यक्रम दुपारी 12.30 वाजता सेवाग्राम येथील महात्मा गांधी आर्युविज्ञान महाविद्यालयाच्या नवीन सभागृहात पार पडणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित आसन व्यवस्था असल्यामुळे निमंत्रण पत्रिका असलेल्या मान्यवरांनी दुपारी 12 वाजता सभागृहात उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे .

सेवाग्राम विकास आराखडया अंतर्गत वर्धा सेवाग्राम रोडवर चरखागृह तयार करण्यात आले असून येथे 1 हजार आसन क्षमतेचे सुसज्ज असे चरखा सभागृह बांधण्यात आले आहे. सोबतच विशेष कार्यक्रमाच्या आयोजन करीता ओपन एअर स्टेजची निर्मिती करण्यात आली आहे. चरख्याचे महत्व आणि विविध प्रकार सांगणारे चरखा संग्रहालय साकारण्यात आले आहे.

चरखागृहात जगातील सर्वांत उंच म्हणजे 18.5 फुट उंचीच्या चरख्याची उभारणी करण्यात आली आहे. सभागृहाची शोभा वाढविण्यासाठी जगातील पहिलेच आणि भारतातील एकमेव अशा महात्मा गांधीचे 31 फुट आणि विनोबा भावे यांचे 19 फुट उंचीचे स्क्रॅप पासुन व्यक्तीचित्र उभारण्यात आले आहे.

सेवाग्राम आश्रम परिसरात पर्यंटकांना राहण्याची सुविधा व्हावी यासाठी 76 व्यक्ती क्षमतेचे यात्री निवास, सुसज्ज डॉरमेट्री, सेवाग्राम आश्रमाला पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी तयार करण्यात आली आहे. पर्यंटकांची 300 चारचाकी वाहने उभी राहू शकतील असे वाहनतळ बनविण्यात आले आहे. सोबतच महिला व पुरुषाकरीता प्राथमिक सुविधा केंद्र तयार करण्यात आले आहे.

विनोबा भावे यांच्या पवनार येथील परिसरात धाम नदीच्या तीरावरील दक्षिणेकडे नागरिकांना नदीवर मुर्ती विर्सजन करण्याकरीता 1 लाख लिटर पाण्याची क्षमता असलेले डोळयाच्या आकाराच्या कुंडाची निर्मिती करण्यात आली आहे. वर्धा शहरातील महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, झाशीराणी चौक, विश्रामगृहचौक , सेवाग्राम मेडिकल कॉलेज चौक, इत्यादी नऊ चौकांमध्ये ऐतिहासिक घटना दर्शविणारे शिल्प निर्मिती करुन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या चौकातील रोषणाई रात्रीच्या वेळेला शहराच्या सौंदर्यात भर घालते. वर्धा शहरातल्या ऐतिहासिक वास्तूंना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांचे बांधकाम सौंदर्यीकरण व पादचारी रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. यासोबतच महत्त्वाच्या रस्त्याचे सिमेंटीकरणाचे आणि शहराच्या भर घालणाऱ्या इतर पायाभुत सुविधांची कामे सुद्धा सुरू आहे.

रस्त्यावर विक्रीसाठी उभे राहणा-या फेरी वाल्यांना हक्काचे विक्री ठिकाण मिळावे यासाठी हाकर्स प्लाझाची निर्मिती करण्यात आली आहे. वर्धा शहरात येणा-या पर्यंटकांचे स्वागत करण्यासाठी दत्तपूर येथे प्रवेश व्दारावर वर्धा शहराची ओळख असणा-या निळकंठ पक्षाचे भव्य स्क्रॅप शिल्प उभारण्यात आले आहे. यासर्व कामाचे लोकार्पण आज होत असून सर्व कामे वर्धा शहराच्या सौदर्यांत भर घालणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या