आयआयटीच्या सात हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले, पाच वर्षांत ड्रॉपआऊटची संख्या वाढली

368

इंजिनीअरिंगच्या शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱया इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मधून गेल्या पाच वर्षांत 7 हजार 248 विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले आहे. ही माहिती लोकसभेत सादर करण्यात आलेल्या आकडय़ांवर आधारित आहे. आयआयटी ड्रॉपआऊटची वाढती संख्या बघता विद्यार्थ्यांना एक्झिट ऑप्शन देण्यावर मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा विचार सुरू आहे.

काय आहे एक्झिट ऑप्शन
एक्झिट ऑप्शनचा अर्थ विद्यार्थ्यांना दुसऱया सेमेस्टरनंतर अभ्यासक्रम बदलून बीटेक ऐवजी बीएसस्सीला प्रवेश घेण्याची अनुमती देणे. अनेक वेळा विद्यार्थी अभ्यासक्रमाचा दबाव सहन करू शकत नाही. अशावेळी त्यांना एग्झिट ऑप्शन दिले तर ते क्षमतेनुसार दुसरा अभ्यासक्रम निवडू शकतात. एग्झिट ऑप्शनसाठी आयआयटी तयार आहेत, मात्र इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) ला हा पर्याय योग्य वाटत नाही.

एक्झिट ऑप्शनचा निर्णय संस्थांचा
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) मधून अर्धवट शिक्षण सोडणाऱया विद्यार्थ्यांचा डेटा उपलब्ध नाही. एक्झिट ऑप्शनचा निर्णय आयआयआयटीवर सोडण्यात आला आहे. 16 ऑक्टोबर रोजी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यासंदर्भात एक बैठक घेऊन आयआयआयटीच्या संचालक मंडळांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. सध्या देशात आयआयआयटी आहेत. त्यापैकी 19 संस्था सार्वजनिक- खासगी भागीदारीवर सुरू आहेत.

विद्यार्थ्यांना एक्झिट ऑप्शन देण्याचा पर्याय आम्हाला मान्य नाही. कारण त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल. एक्झिटऐवजी संस्थांनी आपल्या प्राध्यापकांवर विश्वास ठेवला पाहिजे. प्राध्यापक अनेक वर्षे काम करीत असतात. त्यांना विद्यार्थ्यांचे हित समजते. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगवेगळा फॉर्म्युला असू शकत नाही. त्याऐवजी शैक्षणिक संस्थांनी उपाययोजना केल्या पाहिजेत. – एस. सदागोपाल, संचालक, आयआयआयटी, बंगळुरू

आयआयआयटी आपल्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असते. विशेष करून पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर. पहिल्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना अतिरिक्त शैक्षणिक मदत करण्यासाठी आमच्याकडे पूर्ण व्यवस्था आहे. सरकारने पर्यायी डिग्रीवर काम केले पाहिजे. शक्य असेल तर चार वर्षांचा अभ्यासक्रम करणाऱया विद्यार्थ्यांना तीन वर्षांची पर्यायी डिग्री आणि एक्झिटचा पर्याय दिला पाहिजे. – पी. जे. नारायणन,
आयआयआयटी, हैदराबाद

आपली प्रतिक्रिया द्या