
आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनासाठी युरोप हे खंड प्रसिद्ध आहे. अनेक लोक युरोपातील देशांमध्ये आपली सुट्टी व्यतित करतात. पण, आता हेच पर्यटन या देशांच्या पर्यावरणाला हानी पोहोचवत असल्याचं उघड होत आहे.
बाहेरून येणारे पर्यटक हे युरोपातील अनेक देशांचे किनारे खराब करत असल्याचं अहवाल जाहीर झाला आहे. जर्नल ऑफ एनव्हायर्नमेंटल मॅनेजमेंटच्या एका अहवालानुसार, बाहेरून येणाऱ्या पर्यंटकांमुळे स्पेन येथील प्रसिद्ध ग्रेन केनेरिया बेटाची नासधूस होत आहे. हे बेट पाहण्यासाठी अनेक पर्यटक दाखल होत असतात.
हे बेट वाळूच्या टेकड्यांसाठी प्रसिद्ध आहे. पर्यावरणाच्या दृष्टिने अनोखा आविष्कार असलेल्या बेटाचं आकर्षण पर्यटकांना विशेष आहे. 1982पासून या बेटावरील पर्यावरणाचं संरक्षण करण्यात येत आहे. पण, पर्यटकांच्या सेक्स करण्यामुळे इथल्या निसर्गाची हानी होत आहे.
वाळू, सूर्यप्रकाश, समुद्र आणि पर्यटकांचं सेक्स यांमुळे इथला निसर्ग उद्ध्वस्त होत आहे. संशोधकांनी निसर्गरम्य ठिकाणी असलेले 298 सेक्स स्पॉट शोधून काढले आहेत. या सगळ्या जागा वाळूच्या खडकांच्या तसेच झाडाझुडपांमधल्या आहेत. पर्यटक सेक्ससाठी एकांत शोधत इथे येतात. अनेक रोपटी नष्ट करून आणि वाळू दूर करून तिथे जागा मोकळी करतात.
जाताना तिथे सिगरेट, कंडोम, टॉयलेट पेपर, वाइप्स, खाण्याचे डबे असा कचरा फेकून जातात. काही जण तिथे शौचालाही बसतात. ही ठिकाणं जितकी दूर असतात, तितका त्यांचा वापर जास्त होतो आणि पर्यायाने तिथे कचराही अधिक सापडतो. पर्यटकांच्या या किळसवाण्या कृत्यांमुळे या बेटावरील आठ दुर्मीळ प्रकारच्या प्रजातींची झाडं धोक्यात आली आहेत.
या भागात एक मोठ्या आकाराची पाल देखील पाहायला मिळत असे. ती पाहण्यासाठी लोक लांबून येत होते. पण, ती एक दिवस पर्यटकांनी टाकलेले कंडोम खाऊन मृत्युमुखी पडली. या अहवालाचा उद्देश सार्वजनिकरित्या चालणाऱ्या लैंगिक संबंधांना थांबवणं हा नसून त्यामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानाविषयी जागरूक करण्याचा असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.




























































