Ajit Pawar Death – अन् ‘तो’ फोटो अखेरचा ठरला!

कळव्याजवळील विटाव्यात राहणारे विदीप जाधव म्हणजे अजितदादांची सावलीच. दादांचे पीएसओ असणारे विदीप जाधव गेली अनेक वर्षे त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. आज अजितदादांसोबत मुंबई ते बारामती विमान प्रवासात त्यांनी दादांसोबतचा एक फोटो त्यांच्या पत्नीला व्हॉट्सअॅपवर पाठवला आणि दुर्दैवाने तो फोटो अखेरचा ठरला.

विदीप जाधव हे विटाव्यात राहतात. त्यांचे आई, वडील, पत्नी, 13 वर्षांची मुलगी आणि नऊ वर्षांच्या मुलासोबत राहतात. त्यांची दोन्ही मुले ठाणे पोलीस स्पूलमध्ये शिकतात. सूर्यनगर परिसरातील साईकृष्णा विहार या इमारतीच्या बी विंगमध्ये त्यांचे वास्तव्य होते. मनमिळाऊ आणि सदैव मदतीसाठी तत्पर अशी त्यांची विटाव्यात ओळख. मुंबई पोलीस दलात 2009 च्या बॅचचे पोलीस शिपाई असणारे विदीप हे गेली अनेक वर्षे अजितदादांचे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. विदीप जाधव यांनी फोटो पाठवल्यानंतर अवघ्या काही मिनिटात विमान कोसळल्याची बातमी टीव्हीवर झळकली आणि जाधव कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. या अपघातानंतर जाधव यांचे कुटुंबीय बारामतीकडे रवाना झाले.

अजितदादांसोबत बारामती येथे जाण्यासाठी विदीप जाधव हे पहाटे सवासहा वाजता विटाव्याच्या घरातून निघाले. विमानात बसल्यावर त्यांनी अजितदादांसोबत एक फोटो काढला आणि तो त्यांच्या पत्नीला व्हॉट्सअॅपवर पाठवला. दुर्दैवाने हाच फोटो त्यांच्या अखेरचा ठरला.