
अन्नातून विषबाधा झाल्याने तीन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील अस्नोली येथे घडली. काव्या (१०), दिव्या (८) व गार्गी भेरे (५) अशी मृत बहिणींची नावे असून त्यांना सोमवारी अन्नातून विषबाधा झाली होती. यापैकी दोघींवर नायर व एकीवर एसएमबीटी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत किन्हवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र मुलींच्या नातेवाईकांनी हत्येचा संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.
शहापूरलगत असलेल्या चेरपोली येथील संदीप भेरे यांची पत्नी संध्या तीन मुलींसह गेल्या आठ महिन्यांपासून आस्नोली येथे माहेरी राहते. सोमवारी २१ जुलै रोजी काव्या, दिव्या व गार्गी या तिघींना पोटदुखी व उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने आईने आस्नोली येथील खासगी डॉक्टरकडे नेले. मात्र मुलींना त्रास वाढू लागल्याने नंतर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिघींची प्रकृती चिंताजनक असल्याने मुंबईच्या नायर व घोटी येथील एसएमबीटी या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान काव्या व गार्गीचा गुरुवारी तर दिव्याचा आज सकाळी मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचाराची शर्थ केली. मात्र मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि तिघींवर काळाने झडप घातली.
शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
सख्ख्या तीन बहिणींच्या मृत्यूने तालुकावासीय हळहळले. मुलींच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याने शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती किन्हवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी दिली.