शहापूर-सरळांबे रस्त्याची चाळण, खड्ड्यांमुळे पुलाचा रस्ता खिळखिळा

शहापूर-सरळांबे मार्गावरील तुते गावाजवळील पुलाची अवस्था सध्या अतिशय बिकट झाली आहे. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता खिळखिळा झाला असून अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. या पुलावर चिखलाचे सम्राज्य निर्माण झाले आहे. रस्ता खड्यात गेल्याने वाहनांचे नुकसान तर होत आहेच शिवाय अपघातही वाढले आहेत. या ठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

शहापूर ते सरळांबे हा रस्ता खड्डेमय झाला आहे. खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी या मार्गाची अवस्था झाली असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुलावरील खड्डे बुजवण्यासाठी विटांचे तुकडे टाकण्यात आले होते. मात्र मुसळधार पावसामुळे विटांच्या तुकड्यांचे रूपांतर चिखलात झाले आहे. खड्डे चुकवताना वाहनचालकांच्या नाकीनऊ आले आहे. त्यामुळे अपघात वाढले आहेत. नवीन रस्ता तर सोडाच पण रस्त्याची डागडुजी करण्याकडे प्रशासनाने कमालीचे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संताप आहे

.. अन्यथा आंदोलन

बामणे, कवडास, तुते, काळेपाडा, अर्जुनली, सरळांबे आणि खुटाडी या गावातील हजारो नागरिक या मार्गावरून दररोज प्रवास करतात. मात्र या मार्गाची चाळण झाली झाल्याने विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.