
>> शैलेंद्र शिर्के
पृथ्वीसारखा दुसरा एखादा सजीव सृष्टी असलेला ग्रह असावा असे अनेकदा आपण ऐकतो आणि त्यासोबतच उडत्या तबकड्यांबाबत चर्चा सुरू होते. मात्र याला पुष्टी देणारे पुरावे अद्यापही संशोधकांच्या हाती लागले नाहीत. असे असले तरी यूएफओ आणि परग्रहवासीयांविषयीचे संशोधक यांचे याबाबतचे संशोधन सुरूच आहे. परग्रहवासी आणि उडत्या तबकड्या हा विषय कायमच कुतूहल आणि जिज्ञासा निर्माण करणारा आहे. उडत्या तबकड्यांच्या अस्तित्वाविषयी ठोस काही सांगता येणार नाही, तसे पुरावे नाहीत, असे निष्कर्ष काढून झाले असले तरी तबकड्यांचे भिरभिरणे खरंच कुणीतरी आहे का तिथे? हा प्रश्न मात्र निर्माण करतात.
या अथांग विश्वात कुणीतरी खरोखरच आहे का तिथे? पृथ्वीसारखा दुसरा नांदता, सजीव सृष्टी असलेला, बुद्धिमान सजीव असलेला ग्रह आहे का आणखी कुठे आणि असेल तर अद्याप अशा संस्कृतीशी, परग्रहवासीयांशी आपला संपर्क का होत नाही? गेल्या काही आठवड्यांतील तीन घडामोडींमुळे या प्रश्नांनी पुन्हा जिज्ञासूंची मने चाळवली गेली आहेत. यातील पहिली घटना होती, ऑगस्टच्या प्रारंभी अमेरिकेचा माजी गुप्तचर अधिकारी डेव्हिड ग्रुश याने अमेरिकन सिनेटच्या एका उपसमितीसमोर दिलेली खळबळजनक साक्ष. परग्रहवासी आणि उडत्या तबकड्यांविषयी अमेरिकेकडे भरपूर काही आहे, पण अमेरिका माहिती लपवते आहे, असा आरोपच त्याने केला होता. इतकेच नाही, तर अमेरिकेला गेल्या काही वर्षांत उडत्या तबकड्या मिळाल्या आहेत आणि परग्रहावरील सजीवांचे देहही हाती लागले आहेत. अमेरिका फक्त यातलं काही उघड करत नाही. अतिशय गोपनीयपणे अमेरिकेचा यासंबंधीचा संशोधन प्रकल्प गेली कित्येक वर्षे सुरू आहे. आम्ही विचारायला गेलो तर गप्प बसवले जाते, असे ग्रुश याने त्याच्या साक्षीत सांगितले होते. त्याच्या आणखी दोन सहकाऱ्यांनीही याच प्रकारची साक्ष दिली होती.
त्यामुळे मग पुन्हा एकदा उडत्या तबकड्यांचा विषय चर्चेत आला. वास्तविक अमेरिका गेली अनेक वर्षे उडत्या तबकड्यांचा अभ्यास करते आहे. अमेरिकन हवाई दलाच्या एका टीमने ‘प्रोजेक्ट ब्ल्यू बुक’अंतर्गत मार्च, 1952 ते 17 डिसेंबर, 1969 या कालावधीत उडत्या तबकड्या दिसल्याचा दावा करणाऱ्या हजारो प्रकरणांचा अभ्यास केला होता. नेमका आकडा सांगायचा झाला तर 12,618 घटनांचे शक्य तितके शास्त्रशुद्ध विश्लेषण करण्याचा या टीमने प्रयत्न केला. मात्र उडत्या तबकड्यांच्या अस्तित्वाविषयी ठोस काही सांगता येणार नाही, तसे पुरावे नाहीत, असाच निष्कर्ष या अभ्यासाअंती जाहीर करण्यात आला. तरीही अमेरिकाच नव्हे, तर जगातील अनेक देशांत अनेकांना दिसलेल्या या उडत्या तबकड्यांचे भिरभिरणे काही थांबलेले नाही. मग, 2020 मध्ये पुन्हा एकदा अमेरिकेच्याच एका टास्क फोर्सने या विषयाचा पिच्छा पुरवला. या अभ्यास गटाने 2004 ते 2021 या कालावधीतील सर्वाधिक विश्वासार्हता असणाऱ्या 144 घटनांचा आढावा घेतला. हाती काहीच आले नाही (किंवा जाहीर झालेले नाही). त्यामुळे या उडत्या तबकड्या भिरभिरत येतात कुठून आणि जातात कुठे? त्यातून कुणीच कसं उतरत नाही? आणि परग्रहवासी असतीलच तर अद्याप ते मानवाशी संपर्क का साधत नाहीत? ही सर्वसामान्यांची जिज्ञासा अतृप्तच राहिली आहे.
ग्रुश यांच्या साक्षीनंतर जेमतेम तीन आठवड्यांनी यूएफओबद्दल संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना नव्हे, सर्वांनाच जेमी मॉसन यांनी धक्का दिला. हे मॉसन म्हणजे यूएफओ आणि परग्रहवासीयांविषयीचे संशोधक. त्यांनी 12 सप्टेंबर रोजी मेक्सिकन लोकप्रतिनिधींसमोर कथित ‘परग्रहवासीयांचे’ दोन मृतदेह तथा जिवाश्म स्वरूपातील ममीच काचबंद पेटीतून आणून दाखवल्या. पुन्हा एकदा जगभर एकच खळबळ. जिवाश्म स्वरूपातील हे अवशेष आपल्या ग्रहावरील कुठल्याच सजिवाच्या उपांतीचा भाग नसून त्यांची बहुतांश जनुकीय संरचनाही अज्ञात असल्याचे मॉसन यांनी या अधिवेशनात शपथेवर सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, लहानखुऱ्या चणीच्या एलियनचे हे अवशेष पेरू देशातील कुस्को येथील एका खाणीत मिळाले आहेत. आपल्या भूपृष्ठीय उपांती पाचा भाग नसलेले हे अवशेष एखाद्या कोसळलेल्या उडत्या तबकडीतून मिळालेले नाहीत. हे अवशेष एक हजार वर्षांपूर्वीचे असून तिथल्या एका खाणीत जिवाश्म स्वरूपात त्यांना सापडले. मेक्सिकोच्या स्वायत्त राष्ट्रीय विद्यापीठातील संशोधकांनी या अवशेषांचा अभ्यास केला असून रेडिओकार्बन डेटिंग तंत्राद्वारे त्यांनी या अवशेषांमधून डीएनएही मिळवले आहेत. या डीएनएपैकी 30 टक्के डीएनए संरचना अज्ञात असल्याचे त्यांना आपल्याकडील इतर डीएनए नमुन्यांशी तुलना केल्यावर आढळून आल्याचे मॉसन यांनी सांगितले. या अवशेषांची क्ष -किरण चिकित्साही झाली असून या तपासणीत एका मृतदेहाच्या आत अंडी असल्याचे दिसत असून दोन्ही देहांमध्ये ओस्मियमसारख्या अत्यंत दुर्मीळ धातूचे इम्प्लान्टही आहेत असे मॉसन यांचे म्हणणे, पण हे मॉसन भरवशाचे नाहीत असे वैज्ञानिकांचेच म्हणणे आहे.
मॉसन यांनी याआधीही एलियन सापडल्याचे दावे केले आहेत. मात्र ते कालांतराने फेटाळण्यात आले होते. 2017 मध्ये नाझ्का, पेरूमध्येच एलियनचे पाच अवशेष सापडल्याचा त्यांनी दावा केला होता. हे अवशेष प्रत्यक्षात लहान मुलांचे असल्याचे नंतर समोर आले होते. आताही त्यांच्या दाव्यांना अतिरंजित म्हटले जात असून डीएनए मिळवल्याचा विद्यापीठातील संशोधकांनी इन्कार केला आहे. आम्ही फक्त त्या अवशेषांचे वय निश्चित केले, बाकी यातलं आम्हाला काही माहीत नाही असे त्यांचे म्हणणे आहे, तर पेरूतील पुरातत्त्व विभागाने “मॉसनने आमच्या देशातून हे अवशेष नेलेच कसे!” म्हणत कायदेशीर कारवाईची तयारी सुरू केली आहे. अर्थात मॉसन म्हणतात, माझ्यावर फक्त टीका करणाऱ्यांनी माझे म्हणणे खोडून काढणारा एकही पुरावा सादर केलेला नाही.
म्हणजे पुन्हा गाडे तिथेच येऊन थांबले. उडत्या तबकड्या आहेत की नाही? आणि असल्याच तर परग्रहवासी आपल्याकडे काय फक्त पर्यटनाला येतात आणि कुणाला न भेटताच निघून जातात… हे कसे शक्य आहे? मॉसनने एलियनचे अवशेष सादर केल्यावर तीनच दिवसांनी 15 सप्टेंबरला नासाने उडत्या तबकड्यांविषयी आणखी एका समितीचा अहवाल जाहीर केला. उडत्या तबकड्या आणि परग्रहवासी आहेत की नाही, याबद्दल अशा घटनांमधील सनसनाटी, थ्रिलिंग मालमसाला वगळून उपलब्ध पुराव्यांची उपग्रह, अंतराळातील अवकाश निरीक्षणपर दुर्बिणी असे अद्ययावत तंत्रज्ञान मदतीला घेऊन तपशीलवार वैज्ञानिक चिकित्सेची गरज आहे, असे या समितीचे म्हणणे पडले. आता या ‘पुराव्यानिशी सिद्ध करीन…’ टाइपचे संशोधन करण्यासाठी नासाने एका संशोधन गटाची स्थापना केली आहे.
परग्रहवासी असलेच तर ते कुठे असतील? हा विषय तसा खूप मोठा आहे. 1977 मध्ये आपल्या ग्रहमालेचा आणि त्यापलीकडचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेली व्हॉयेजर याने मानवाची आणि पृथ्वीची माहिती असणारे फोनोग्राफ घेऊन कधीच आपल्या सूर्यमालेबाहेर पडून दूर अंतराळाच्या प्रवासाला लागली आहेत. कदाचित त्यांचीही कुठल्या प्रगत संस्कृतीशी गाठ पडेल आणि त्यांना पृथ्वीची, आपली माहिती मिळेल. ते परग्रहवासी चांगले असतील की वाईट? येतील तेव्हा बघू!


























































