
लातूर शहर विधानसभेसाठी महायुतीच्यावतीने भाजपच्या शैलेश लाहोटी यांनी पालकमंत्री निलंगेकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे पप्पु कुलकर्णी, रिपाईचे चंद्रकांत चिकटे, महापौर सुरेश पवार, गटनेते शैलेश गोजमगुंडे व स्मिता परचुरे उपस्थिती होते. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून लातूर शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून महानगर पालिकेच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामे होत आहेत. लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने वॉटर ग्रीडच्या माध्यमातून उजनीचे पाणी देण्यासाठी निविदा काढून त्याच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. या विकास कामांच्या जोरावरच लातूरचा आमदार भाजपचाच होणार असा विश्वास पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला. लाहोटी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या नगरसेवक व पक्ष पदाधिकार्यांच्या बैठकीत निलंगेकर बोलत होते.
महानगर पालिकेच्या निवडणुकीत विजय प्राप्त केल्यानंतर शहर मतदारसंघातील काँग्रेसच्या अस्तित्वाला घरघर लागली असल्याचे सांगत पालकमंत्री निलंगेकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शहर विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून मनपाच्या माध्यमातून विविध विकास कामे कार्यरत आहेत. नगरसेवकांसह पक्ष पदाधिकार्यांनी एकदिलाने, एकजुटीने काम करून विरोधकांचा पराभव करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले. पक्षाने तुम्हाला नगरसेवक केले असून आता तुम्ही पक्षासाठी आमदार द्यावा, असे सांगत शहर मतदारसंघातून भाजपचा आमदार होणार असा विश्वास व्यक्त केला. यावेळी महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, स्थायी समिती सभापती अॅड.दिपक मठपती, गटनेते शैलेश गोजमगुंडे यांच्यासह नगरसेवक, पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.































































