शालिनीताई पाटील यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. मुंबईतील माहीम येथील ज्योती सदन या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

शालिनीताई पाटील गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर माहीम येथील त्यांच्या राहत्या घरीच उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती दिवसागणिक खालावत होती. अखेर आज दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील मूळगावी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

सत्यशोधक विचारांचे प्रणेते ज्योतिजीराव फाळके-पाटील यांच्या शालिनीताई कन्या  होत. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेत वकिलीची पदवी घेतली होती. वसंतदादा पाटील यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्या. 1980 मध्ये शालिनीताई यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये महसूल मंत्रीपद भूषवले होते. पण त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे 1981 मध्ये अंतुले यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, जो त्यावेळच्या राजकारणातील एक मोठा भूपंप मानला जातो.

सांगली लोकसभा मतदारसंघाचेही शालिनीताई यांनी काही काळ प्रतिनिधित्व केले. सातारा जिह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून 1999 ते 2009 या काळात त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 2009 मध्ये त्यांनी क्रांतिसेना महाराष्ट्र नामक स्वतःचा पक्ष काढला, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कालांतराने त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मराठा आरक्षणासाठीही आवाज उठवला

शालिनीताई यांनी पेंद्र सरकारच्या ओबीसी आरक्षणाच्या निर्णयावरही टीका केली होती. आर्थिक निकषावर आरक्षणाची भूमिका त्यांनी ठामपणे मांडली, मराठा आरक्षणासाठीही आवाज उठवला.

इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीय

शालिनीताईनी दीर्घकाळ विधिमंडळात प्रभावी भूमिका बजावली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीय म्हणून त्या महाराष्ट्राला परिचित होत्या. त्या काळात शालिनीताई महाराष्ट्राच्या शक्तिशाली नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या.

जरंडेश्वरच्या उभारणीत शिवसेनेचा हातभार

मातृभूमी हीच कर्मभूमी मानून कोरेगाव तालुक्याच्या उत्कर्षाचे स्वप्न त्यांनी पाहिले. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व वसंतदादा पाटील यांच्यात राजकारणापलीकडेही मैत्रीचे  संबंध होते. शालिनीताईंनी हे काwटुंबिक नाते जपले. 1995 ते 1999च्या युती शासनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची जरंडेश्वरच्या उभारणीत मोठी मदत झाली.

एक स्पष्टवक्त्या, कायद्याच्या अभ्यासक – शरद पवार

राज्याच्या माजी पॅबिनेट मंत्री, माजी खासदार बॅरिस्टर शालिनीताई पाटील यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे. त्या आपली मतं मांडताना कधीही कचरत नसत. जितक्या जाहीरपणे त्या माझ्यावर टीका करत तितक्याच खुलेपणाने ‘शरदचं नेतृत्व मान्य करा.’ हा वसंतदादांचा संदेश शालिनीताई निसंकोचपणे सहकाऱ्यांपर्यंत पोहचवत. एक स्पष्टवक्त्या, कायद्याच्या अभ्यासक, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉँगेसचे नेते शरद पवार यांनी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.