
श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची निवड आज जाहीर झाली. नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्तांनी या निवडी जाहीर केल्या. एकूण 84 ग्रामस्थांच्या यासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, पारंपरिक घटनेप्रमाणे ग्रामस्थांमधून विश्वस्तांची निवड करण्यात आल्यामुळे भाविक आणि ग्रामस्थांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
श्री शनैश्वर देवस्थानचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते, माजी खासदार यशवंतराव गडाख व मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचा नियोजनबद्ध विकास करून भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
दरम्यान, शनैश्वर देवस्थानच्या बदनामीचे षडयंत्र रचत व विकासाला खीळ बसविण्याच्या हेतूने तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात केवळ राजकीय हेतू व सूडबुद्धीतून देवस्थान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्या चार वर्षांच्या काळात देवस्थानविरोधात लेखी तक्रारी, उपोषण, चौकशा तसेच समिती नेमून देवस्थानच्या कारभाराची तपासणी केली गेली. मात्र, राजकीय हेतूने केलेल्या सर्व तक्रारी व चौकशीत देवस्थानला क्लीनचिट मिळाल्याने तक्रारदारांचा खरा चेहरा जनतेसमोर उघडा पडला.
धर्मादाय आयुक्तांनी जाहीर केलेल्या नव्या विश्वस्त मंडळाबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत सर्व ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी राहून सहकार्य करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
नवीन विश्वस्त मंडळ
बोरुडे बाळासाहेब बन्सी, बानकर विकास नानासाहेब, भूतकर छबूराव नामदेव, कुऱहाट पोपट लक्ष्मण, दरंदले शहाराम रावसाहेब, बानकर भागवत सोपानराव, सुनीता विठ्ठल आढाव, दरंदले दीपक दादासाहेब, दरंदले शिवाजी अण्णासाहेब, शेटे पोपट रामचंद्र, शेटे अप्पासाहेब ज्ञानदेव.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जुनी घटना, परंपरा जपली – शंकरराव गडाख
देवस्थानची जुनी परंपरा जपण्यासाठी जुन्या ग्रामस्थांनी जी घटना आणि हिंदू धर्माची परंपरा चालू केली होती, ती राखण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शनिशिंगणापूर येथील पानसनाला प्रकल्पाचा लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होणार असल्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.


























































