शनिशिंगणापुर देवस्थानावर नियंत्रण कुणाचे? पानसतिर्थाचे 24 कोटींचे टेंडर 60 कोटींच्या घरात

39

नवनाथ कुसळकर । सोनई

शनिशिंगणापुर देवस्थान राज्य सरकारने ताब्यात घेतले आहे मात्र राज्य नियुक्त विश्‍वस्त मंडळाची नेमणूक न झाल्याने देवस्थानच्या कारभाराचे नियंत्रण सुटले असून येथील सर्व कारभार रामभरोसे सुरु आहे. दरम्यान, दानपात्रातील पैशाच्या मोजदाद रक्कमेवर कोणतेच नियंत्रण नसल्याने येथे ‘कर्मचारी राज’ सुरु आहे. आलेल्या पैशाचा विनियोग अन्यत्र होत असल्याने कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार उघडकीस येत आहे. गेल्या 10 वर्षापासून रखडलेला पानसतिर्थ प्रकल्प सुशोभिकरणाच्या कामात अनियमित्ता काम न करताच कोट्यावधी रुपयांची बिले काढल्याची माहिती उघड झाली असल्याचे एका विश्‍वस्तांनीच सांगितले. यासर्व घडामोडीच नवीन विश्‍वस्त मंडळ का नेमले जात नाही हा सवाल स्थानिक गांवकरी करीत आहेत.पानसतिर्थाचे 24 कोटींचे टेंडर 60 कोटींच्या घरात गेले आहे.

शनिशिंगणापुर देवस्थान हे 9 जुन 2018 रोजी राज्य सरकारने ताब्यात घेतल्याची घोषणा मंत्रीमंडळात करण्यात आली. त्यानंतर नागपुरच्या अधिवेशानात दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाली. मात्र गेल्या 5 महिन्यापासून शासन नियुक्त मंडळ नेमण्यास दिरंगाई होत असल्याने याविषयी उलटसुलट चर्चा सुरु आहे. देवस्थान सरकार जमा होताच विश्‍वस्त मंडळाने सुरुवातीला जाता जाता कोट्यावधी रुपयाची हात सफाई केली. पुणे येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी घटनेची चौकशी सुरु केली आहे. मात्र विश्‍वस्तांचे अधिकार संपुष्टात आल्याने विश्‍वस्त मंडळ मंदीराकडे फिरकत नाहीत. कुठल्याही निर्णयात भाग घेत नाहीत. त्यामुळे येथे केवळ कर्मचारी राज सुरु असून कार्यकारी दर्जाचा अधिकारी जनसंपर्क अधिकारीपद दोन वर्षांपासून रिक्त असल्याने केवळ दुयम दर्जाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या हातात देवस्थानच्या चाव्या आहेत.

दर आठवड्याला दानपात्र उघडले जाते मात्र दानपात्रातील रकमेची मोजदाद करण्यासाठी कोणतेही नियंत्रण अगर सुरखा व्यवस्था नाही. सीसीटीव्ही कॅमेरे कधी बंद तर चालु असतात. एकही विश्‍वस्त हजर नसतो. त्यामुळे जमा झालेल्या रक्कमेचा हिशोब संशयास्पद असून मोजदाद करतांना कर्मचारीच गफला करतात अशी चर्चा पसरली आहे. शिवाय कर्मचारी या प्रकरणात अडकल्यास कारवाई कोण करणार? तेरी भी चुप… असा सारा प्रकार सुरु असल्याने सद्या तरी देवस्थानचा कारभार रामभरोसे आहे. सध्या पर्यटन, सहलीचे दिवस असल्याने वाढती गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सुविधेकडे दुलर्क्ष होत असल्याने येथे येणार्‍या भाविकाला केवळ मुकाट्यानेच देव दर्शन आटपून परतावे लागते असे चित्र आहे.

शनिमहाराज साक्षात ज्या ठिकाणी प्रगट झाले त्या पानसनाला तिर्थ प्रकल्पाचे काम 2009 साली सुरु झाले. त्या कामाचे सुरुवातीला 24 कोटीचे टेंडर काढले. फेज 1 काम अपूर्ण असतांनाच फेज 2 पुन्हा 24 कोटींचे टेंडर काढले. आजतागायत हे काम अपूर्ण अवस्थेत असून आता हे काम जवळपास 60 कोटींच्या घरात गेले आहे. या कामातील दिरंगाई व बर्‍याच वर्षांपासून सुरु असलेल्या कामात ग्रेनाईट व पिल्लरची कामे झालीच नाहीत. त्या कामाची अशरक्ष: लाखोची बोगस बिले काढली आहेत. शिवाय टेंडर रक्कमेपक्षा 5 पट काम वाढविले आहे. रेट डिर्फ नर्सच्या नावाखाली आकडे जुळवा जुळवी करुन हे काम 60 कोटींच्या घरात घातले असून या कामात कोट्यावधी रुपयाची अफरातफर झाल्याची तक्रार येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच ठरावाद्वारे करुन चौकशीची मागणी केली आहे. तरीही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नवीन विश्‍वस्त कधी नेमणार याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पानसनाला प्रकल्प सुशोभीकरणासाठी गोवा येथील आर्किटेक्टची देवस्थानने नेमणूक केली. काम दिवसेंदिवस वाढत गेल्याने आणि घोटाळ्याची मालिका सुरु झाल्याने हे काम आपण पहात नसुन सर्व अधिकार स्थानिक आर्किटेक्ट यांना दिले असल्याने मी केवळ व्हिजिट मारतो. बाकी कामात माझा काही संबध नाही, असे सांगून गोवा येथील आर्किटेक्टने हात झटकले आहेत.

तिर्थ प्रकल्पामध्ये झालेल्या गैर व्यवहार लक्षात घेता प्रायव्हेट कंपणीकडून कागदपत्राची तपासणी करुन कामातील तफावत, काम न झालेली बिले काढणे याची सर्व शहानिशा करुन विधी व न्याय खात्याकडे तक्रार करणार असून विश्‍वस्त व अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार करणार आहे. – विश्‍वस्त डॉ. वैभव शेटे

आपली प्रतिक्रिया द्या