सरकारने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले, शरद पवारांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad-pawar

सरकारने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान केले आहे. शेतकर्‍यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली की लगेच कांदानिर्यात बंद करून टाकली. या सरकारला शेतीबाबत अजिबात आस्था नाही. त्यांच्या राज्यात 16 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून अशा सरकारला मतदान करू नका, त्यांना दारातच उभे करू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी शेतकर्‍यांना केले.

नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पवार आले असता त्यांनी सभेत भाषण केले. आम्ही सत्तेत असताना एकाच विमा कंपनीकडून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देत होतो, पण आताच्या सरकारने अनेक विमा कंपन्या काढूनही शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर अशा विमान कंपन्यांना चांगलाच धडा शिकवू, असेही पवार यावेळी म्हणाले. मादी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर खोटेनाटे आरोप करून त्यांना तुरुगांत डांबले. आता माझ्यापर्यंतच पोहोचले आहेत. पण काय वाट्टेल ते करा. आम्हाला तुरुंगात जरी टाकले तरी आम्ही शेतकर्‍यांसाठी, सर्वसामान्यांसाठी काम करत राहणार, असेही शरद पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, पक्ष बदलणार्‍यांची मला चिंता नाही. उलट आमचीही त्यांच्यापासून सुटका झाल्याचेही ते म्हणाले.