अजित पवारांचे बारामतीतून माघार घेण्याचे संकेत; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अजित पवार यांनी बारामतीतून माघार घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बारामतीतून पुन्हा विधानसभेची निवडणूक लढण्यात रस नसल्याचे अजित पवार म्हणाले होते. यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी सोमवारी सकाळी पुण्यातमध्ये माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक पुढे ढकण्याच्या निर्णयावरही भाष्य केले. तसेच अजित पवार यांनी बारामतीतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत, त्यावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले.

ते म्हणाले की, सार्वजनिक किंवा राजकीय जीवनामध्ये निवडणुका लढवलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो. जिथे अनुकूल वातावरण असते तिथे त्याप्रमाणे निर्णय घेतले जातात. पण अजित पवार यांच्या मनामध्ये नक्की काय आहे हे मला माहिती नाही. दरम्यान, अजित पवार हे पुतणे रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा आहे.

‘भटकत्या आत्म्याची भीती अजूनही उतरली नसावी, म्हणून…’, रोहित पवार यांचा थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली का? असे विचारले असता पवार म्हणाले की, मला माहिती नाही. याबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायला हवा. पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात वन नेशन, वन इलेक्शन या संकल्पनेचा उहापोह केला. याचा अर्थ सगळ्या निवडणुका एकाचवेळी व्हाव्यात हा त्यांचा आग्रह होता. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोन राज्यांच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या गेल्या. याचा अर्थ पंतप्रधानांच्या म्हणणाला आता फारसे काही महत्त्व द्यायचे कारण नाही. पंतप्रधान बोलतात एक आणि निर्णय दुसराच होतो, याची आपल्याला प्रचिती आली.