
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंब्याची विनंती करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शालजोडीत लगावली आहे. मुख्यमंत्र्यांनी फोन करून आपल्याशी संपर्क साधला आणि पाठिंब्याची विनंती केली होती. या निवडणूक निर्णयाची आम्हाला चिंता नाही. पण तत्व म्हणून सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी विनंती होती ती स्वीकारणं शक्य नाही. सरळ आहे ते आमच्या विचाराचे नाहीत, असे शरद पवार म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षाने त्यांचा उमेदवार जाहीर केला. ते महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. या निवडणुकीसंदर्भात विरोधी पक्षांच्या आमच्या बैठका झाल्या. आमचा निर्णयही झाला. आम्हा सगळ्यांच्या वतीने सुदर्शन रेड्डींचा अर्जही दाखल करण्यात आला. रेड्डी हे एकेकाळी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात न्यायाधीश होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला संपर्क केला होता. आणि सत्ताधारी पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना आपण पाठिंबा द्या. कारण ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने महाराष्ट्रातील मतदारांनी आपल्या राज्यपालाला मतदान करावं ही विनंती, मुख्यमंत्र्यांनी मला केली. आणि नंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही केली. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं शक्य नाही. नंतर मला कोणीतरी विचारलं का शक्य नाही? शक्य नाही हे सरळ सरळ आहे, ते आमच्या विचाराचे नाहीत, असे शरद पवार म्हणाले.
“राज्यपालांसमोर मुख्यमंत्र्यांना अटक केली, अशी ऐतिहासिक घटना यापूर्वी कधी घडली नव्हती”
पण त्याही पेक्षा ते (सी. पी. राधाकृष्णन) झारखंडला राज्यपाल होते. झारखंड हे आदिवासींचे राज्य आहे. आदिवासींची संख्या सर्वात जास्त आहे. तेथील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर एक केस झाली. त्या केस संबंधी किंवा इतर कामासाठी सोरेने हे राजभवनात राज्यपालांना भेटण्यासाठी गेले. तिथे ते भेटायला गेल्यानंतर केंद्रीय तपास संस्था आहेत, सीबीआय, ईडी यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं. कोणी केलं माहिती नाही. पण ते सगळे आले आणि राजभवनात राज्यपालांसमोर मुख्यमंत्र्यांना अटक केली. अशी ऐतिहासिक घटना यापूर्वी कधी घडली नव्हती. मुख्यमंत्री सांगत होते राजभवनात मला अटक करू नका, मी बाहेर येतो. रस्त्यावर अटक करा. माझ्या ऑफिसमध्ये येतो, तिथे अटक करा. माझ्या घरी अटक करा. पण आजचे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे उमेदवार आहेत त्यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या राजभवनामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक केली गेली. याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो, याचं हे ढळढळीत उदाहरण आहे. म्हणून अशांसाठी मताची अपेक्षा करणं आम्हाला योग्य वाटत नाही, असा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
मला मतांची संख्या माहिती आहे. राज्यसभा आणि लोकसभेची एकंदर मतं ही आमची कमी आहेत. त्यामुळे त्याच्या निर्णयाची आम्हाला चिंता नाही. पण तत्व म्हणून सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी विनंती होती ती स्वीकारणं शक्य नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.





























































