
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ‘आम्हा दोघांचे एक वेगळेच नाते होते’ असे म्हणत दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली.
दिलीप कुमार यांना पहिल्यांदा जवळून पाहिले तेव्हाचा किस्सा शरद पवार यांनी या वेळी सांगितला. ते म्हणाले, ‘‘तेव्हा आम्हाला कळले होते की पुण्यातल्या जेजुरीजवळ दिलीप कुमार यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. ते पाहायला आम्ही सायकलवरून गेलो होतो. तेव्हा दिलीप कुमार यांना पहिल्यांदा जवळून पाहण्याची संधी मिळाली.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘पुढे विधिमंडळात, राज्य सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर दिलीप कुमार आणि माझे एक वेगळे नाते निर्माण झाले होते. माझ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ते आग्रह करून एखाद् दुसरी सभा घेण्यासाठी येत असत.’’
आम्ही जेव्हा परदेशात त्यांच्यासोबत गेलो होतो, विशेषतः इजिप्त, जपान अशा देशांमधे, तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोक गर्दी करायचे. दिलीप कुमार यांनी हिंदुस्थान-पाकिस्तान, हिंदुस्थान-चीन अशा युद्धांच्या दरम्यान हिंदुस्थानी सैन्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कायम सहकार्य केले, असेही शरद पवार यांनी सांगितले. अलीकडच्या काळात त्यांची प्रकृती ठीक नव्हती. काही दिवसांपूर्वी मी त्यांना भेटूनही आलो होतो. पण मी माझ्या एका जवळच्या स्नेह्याला आज मुकलो. दिलीप कुमार यांना जेवढे आयुष्य लाभले, त्यात त्यांनी कलेची अखंड सेवा केली. त्यांच्या या सेवेबद्दल आणि त्यांना कृतज्ञ राहायला हवे, असे शरद पवार म्हणाले.






























































