
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात सुरू होती. या चर्चेत मुख्यमंत्री कुठेच नव्हते, त्यामुळे विलीनीकरणाच्या मुद्दय़ावर त्यांना भाष्य करण्याचा अधिकार नाही. यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख करण्याचा त्यांना अधिकार काय, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज सकाळी बारामती येथे विविध मुद्दय़ांवर माध्यमांशी संवाद साधला. या वेळी पत्रकारांनी विलीनीकरणाचा मुद्दा असता तर अजित पवारांनी मला सांगितले असते, त्याची कल्पना मला दिली असती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, तर शरद पवार एनडीएला पाठिंबा देणार होते का? असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याकडे लक्ष वेधले. त्यावर शरद पवार यांनी यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख करण्याचा त्यांना काय अधिकार आहे? असा सवाल करत या विषयात मुख्यमंत्र्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले.
विलीनीकरणाच्या मुद्दय़ावर आमचे सहकारी जयंत पाटील आणि अजित पवार चर्चा करत होते. ती पूर्णपणे गैरराजकीय स्वरुपाची होती. आता आम्हा लोकांच्या समोर संकट आहे. परस्परांना धीर देण्याचे काम आम्ही करत आहोत. राजकीय निर्णयाच्या संबंधी आम्ही कुणाशी चर्चा करत नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद
सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्याचा आनंद आहे. राजकीय आयुष्यात संधी मिळणे ही सकारात्मक बाब असून त्याकडे समाधानाने पाहतो, असे शरद पवार म्हणाले.
अजितदादांच्या स्मारकाबाबत माहिती नाही
बारामतीमध्ये अजितदादांचं स्मारक बांधलं जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत शरद पवार म्हणाले, बारामतीत ही गोष्ट होतेयं मला माहिती नाही. ज्या जागेबाबत चर्चा केली जात आहे, त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. त्यामुळे याबाबतीत मला तरी माहिती असायला हवी, असे शरद पवार म्हणाले.
अमेरिकेसोबतचा करार शेतकऱ्यांसाठी काळजीचा
अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये जो करार होत आहे, त्याचे स्वच्छ चित्र दोन दिवसांत समोर येईल. त्या वेळी त्याच्यावर सविस्तर भाष्य करण्यात येईल. मात्र आता लोकांच्या समोर अमेरिकेने जाहीर केल्यानुसार कृषीक्षेत्रात त्यांना निर्यात करता येईल अशी तरतूद आहे. ही तरतूद भारतीय शेतकऱयांच्या दृष्टीने काळजी करण्याची गोष्ट आहे, असे शरद पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार आहे काही समजलं नाही. या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते. त्यामुळे त्यांना यावर भाष्य करण्याचा काय अधिकार आहे मला कळलं नाही. – शरद पवार






























































