
काँग्रेसमध्ये प्रवेश करून नारायण राणे यांनी चूक केली. शिवसेना सोडण्यापूर्वी काँग्रेसमध्ये जायचे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचे याचा निर्णय राणे यांनी चिठ्ठी टाकून घेतला. त्यांनी काँग्रेसची चिठ्ठी उचलली ती त्यांची चूक होती की घोडचूक होती हे त्यांनीच ठरवावे, अशी मिश्कील टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. तर नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करू नये यासाठी मी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता, अशी आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितली.
खासदार नारायण राणे यांच्या ‘झंझावात’ व इंग्रजी भाषेतील ‘नो होल्डस बार्ड’ आत्मचरित्राच्या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार व नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले त्यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी मंत्री विनोद तावडे, आशीष शेलार, खासदार सुनील तटकरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, नारायण राणे यांना काँग्रेसमध्ये राज्याचे नेतृत्व देण्याच्यासंदर्भात काही आश्वासने देण्यात आली, पण तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की, पाच-सहा महिन्यांत असे काही घडेल असे मला वाटत नाही. तसेच काँग्रेसमध्ये आश्वासने मिळत असतात ती फक्त लक्षात ठेवायची असतात. आमच्या लोकांचे आयुष्य त्यात गेले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
प्रेरणा शिवसेनाप्रमुखांचीच
मी सगळ्यात जास्त प्रेम कोणावर केले असेल तर ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात माझे जे काही कौतुक होते, झाले त्याचे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच असल्याची आणि पुस्तक लिहिण्यामागील प्रेरणा शिवसेनाप्रमुखांचीच होती, अशी कबुली नारायण राणे यांनी यावेळी दिली.
























































