शरद पवार पुन्हा कामाला लागणार, लवकरच करणार राज्याचा दौरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरोग्याच्या कारणामुळे जवळपास तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर शरद पवार पुन्हा राजकीयदृष्ट्या सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. शरद पवार पुढील दोन आठवड्यांत राज्यव्यापी संपर्क अभियान सुरू करण्याची तयारी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पुन्हा उभारणी करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला मोठा फटका बसला असून सत्ताधारी अजित पवार गट आणि इतर पक्षांकडे मतदारांचा कल वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे पक्ष संघटना तळागाळापासून मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ नेत्यांनी दिली.

“थोड्या विश्रांतीनंतर पवार साहेब लवकरच पुन्हा सक्रिय होणार आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि पक्षाची पुनर्बांधणी हेच प्राधान्य असेल,” असे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

या दौऱ्याचाच भाग म्हणून 30 मार्च रोजी स्थानिक निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या प्रतिनिधींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर 31 मार्च ते 2 एप्रिलदरम्यान मुंबईत जिल्हानिहाय संघटनात्मक बैठका घेण्यात येणार आहेत.

शशिकांत शिंदे यांनी या निवडणुकांतील यशाला नैतिक विजय असे संबोधले. “पैशाचा प्रभाव आणि सत्तेचा गैरवापर याविरोधात आम्ही लढलो. आमच्या उमेदवारांच्या यशातून जनतेचा विश्वास आणि लोकशाही मूल्यांप्रती बांधिलकी दिसून येते,” असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, पवार यांच्या पुनरागमनासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबतच्या चर्चांनाही वेग आला आहे. सत्ताधारी गटाचे आमदार सुनील शेळके यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली. “दोन्ही गट एकत्र आल्यास कार्यकर्ते आणि नेत्यांना फायदा होईल,” असे त्यांनी म्हटले. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उपसभापती अण्णा बनसोडे यांनीही विलिनीकरणाचे स्वागत केले जाईल, असे मत व्यक्त केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाचा अंतिम निर्णय हा सुनेत्रा पवार यांच्यावर अवलंबून असल्याचे सांगितले.