मुंबई इंडियन्सचा ‘डबल बूस्टर’; शार्दुल-रुदरफोर्डचा आगामी मोसमासाठी संघात समावेश

गतवर्षीच्या 2025 च्या आयपीएलमध्ये  मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी आणि मधल्या फळीत सातत्याचा अभाव जाणवला होता. शेवटच्या षटकांत धावा रोखण्यात अपयश, तसेच फिनिशरकडून मोठय़ा खेळीचा अभाव या दोन मोठय़ा उणिवा मुंबई इंडियन्सला महागात पडल्या होत्या. यंदा मात्र फ्रँचायझीने हंगाम सुरू होण्यापूर्वीच या दोन्ही कमकुवत दुव्यांवर नेमका वार करताना अष्टपैलू वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि शेरफेन रुदरफोर्ड या दोघांची खरेदी करत संघाला आणखी मजबूत केले आहे.

मधल्या फळीत पॉवर हिटरची भर

गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या मध्यफळीत स्फोटक फलंदाजीचा अभाव स्पष्ट जाणवत होता. शेवटच्या 5-6 षटकांत गती वाढवण्यात संघ अडखळायचा. यंदा या कमतरतेचा उपाय म्हणजे शेरफेन रदरफोर्डला गुजरात टायटन्सकडून 2 कोटी 60 लाखांत विकत घेतले आहे. या वेस्ट इंडीजच्या फलंदाजाकडे 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंद्रे रसेलबरोबर त्याने केलेली 139 धावांची धडाकेबाज भागीदारी त्याची विध्वंसक क्षमता सिद्ध करते. मुंबई इंडियन्ससाठी तो शेवटच्या षटकांचा ‘गति देणारा इंजिन’ ठरू शकतो.

गत हंगामातील चुकांची भरपाई?

मुंबई इंडियन्सला 2024-25 हंगामात सर्वात जास्त त्रास दिला तो शेवटच्या षटकांत धावा फटकावण्यातील अपयश, फिनिशिंगची कमतरता, मधल्या फळीत स्थिरता नसणे, शार्दुल आणि रदरफोर्ड हे दोघेही हे त्रास कमी करण्यासाठी ‘परफेक्ट फिट’ वाटतात.

शार्दुल गेम चेंजर ठरू शकतो

गतहंगामात ‘डेथ ओव्हर्स’मध्ये मुंबई इंडियन्सला प्रचंड धावा मोजाव्या लागल्या. गोलंदाजीची लय सापडत नसल्याने अनेक सामने हातातून निसटले. अशा वेळी शार्दुल ठाकूर हा अनुभवी पर्याय संघासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो. त्याने ‘डेथ ओव्हर्स’मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. गेल्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना त्याने 10 सामन्यांत 13 विकेट टिपले होते.