
इस्रायल-अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या घमासान युद्धाचा परिणाम हिंदुस्थानी शेअर बाजारावरही होत आहे. हे युद्ध बराच काळ चालण्याचा अंदाज वर्तवला जात असून जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट घोंघावत आहे. त्यामुळे शेअर बाजारात तुफान विक्री सुरू आहे. बुधवारी बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी-20 मध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. यामुळे गुंतवणूकदारांना लाखो कोटींचा फटका बसला आहे.
सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी होळीनिमित्त बाजार बंद होता. सुट्टीनंतर गुंतवणूकदार पुन्हा खरेदीकडे वळतील असे वाटत होते. मात्र मध्य पूर्वेत सुरू असलेले युद्ध आणखी बराच काळ सुरू राहण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे बुधवारी बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 1718.32 अकांची घसरण झाली आणि निर्देशांक 78,520 वर पोहोचला. तर दुसरीकडे निफ्टी-50 मध्येही 512 अकांची घसरण झाली आणि निर्देशांक 24,632 वर पोहोचला. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे 9.3 लाख कोटी रुपया स्वाहा झाले.
पडझडीचे कारण काय?
शेअर बाजारातील पडझडीचे सर्वात मोठा कारण मध्य पूर्वेत सुरू असलेले भीषण युद्ध आहे. इस्रायल-अमेरिका आणि इराणमधील युद्ध चांगलेच पेटले आहे. यामुळे युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. कच्चा तेलाच्या बॅरलची किंमत 80 डॉलर पार पोहोचली आहे. याचा फटका हिंदुस्थानलाही बसणार असून शेअर बाजारावरही दबाव दिसून येत आहे.
गॅस कंपनीचे शेअर पडले
इराणने आखाती देशातील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले चढवले आहेत. यात कतारचाही समावेश आहे. या हल्ल्यांमुळे कतारने एलएनजी प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट प्रभाव हिंदुस्थानी गॅस शेअर कंपन्यांवर पडला आहे. हिंदुस्थान 50 टक्के गॅस आयात करतो आणि यातील 60 टक्के कतार आणि युएईकडून येतो. आगामी काळात गॅसची टंचाई भासण्याची शक्यता असल्याने गॅस कंपनीच्या शेअरवरही दबाव दिसत आहे.
किती घसरण
ओएनजीसी -0.27 टक्के
आईजीएल -2.82 टक्के
बीपीसीएल – 3.76 टक्के
आईओसी -3.83 टक्के
गेल – 5.21 टक्के
























































