बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई गँगचा शार्पशूटर सुखबीर बलबीर सिंह उर्फ सुखा याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पानिपतमधील एका हॉटेलमधून सुखाला ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे सुखाला पकडण्यासाठी पोलिसांनी महिला कर्मचाऱ्याच्या मदतीने मास्टर प्लान केला होता.
‘असा’ अडकला सुखा
दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, महिला कर्मचाऱ्याला सुखासोबत मैत्री करण्यास सांगितले. त्याप्रमाणे महिलेने सुखाशी मैत्री केली. मग हळूहळू त्याचा विश्वास जिंकला. मग दोघांमध्ये संवाद सुरू झाला. सर्वकाही ठरल्याप्रमाणे झाल्यानंतर बुधवारी स्टिंग ऑपरेशन करण्याचे ठरले.
बुधवारी महिलेने सुखाला फोन करून आपण खूप प्यायली आहे आणि पानिपतमध्ये कुठेतरी आहे. नक्की कुठे मला माहित नाही, पण अभिनंदन हॉटेलमध्ये आहे. तुला लोकेशन पाठवते इकडे ये, असे सांगितले. सुरवातीला सुखाला संशय आला पण नंतर तो भेटायला तयार झाला.
सुखबीर अभिनंदन हॉटेलमधील एका खोलीत महिलेसोबत दारू पित असताना मुंबई पोलिसांनी छापेमारी करत त्याला अटक केली. अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी सुखाची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.