मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, वाशिष्ठी शास्त्री पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील चिपळूण येथील पूल व संगमेश्वर येथील शास्त्री नदीवरील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पुढील दोन दिवस हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पूल दुपारी 12 ते 4 या वेळेत बंद होते. आज या स्ट्रक्चरल ऑडिटच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे दुपारी बारा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत या पुलावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू होती. अवजड वाहने महामार्गावरच उभी करण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस कर्मचारी महामार्गावर लक्ष ठेवून होते.

संगमेश्वर मधील शास्त्री आणि सोनवी पूलाची उभारणी ब्रिटिश काळात 1937 आणि 1939 या कालावधीत झालेली आहे. सद्यस्थितीत या पूलांवरुन 50 टन क्षमतेची वाहने जा ये करीत असल्याने पूलाचा भाग हलतो आणि पादचाऱ्यांच्या मनात भितीची भावना निर्माण होते. याचबरोबर या पूलांना काही ठिकाणी तडे गेल्याचेही निदर्शनास आले असल्याने वाहनचालकांनी देखील भिती व्यक्त केली होती. आज वाशिष्ठी पूला बरोबरच शास्त्री पूलाचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरु झाले मात्र सोनवी आणि बावनदी पूलाच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.