वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी आज टीम इंडियाची निवड, शिखर धवनला पुन्हा संधी?

669

हिंदुस्थानचा क्रिकेट संघ बांगलादेश दौरा आटोपल्यानंतर वेस्ट इंडीजशी दोन हात करणार आहे. हिंदुस्थान -वेस्ट इंडीज यांच्यामध्ये प्रत्येकी तीन ट्वेंटी-20 व वन डे मालिकांचे आयोजन करण्यात येणार असून यासाठी उद्या हिंदुस्थानची सीनियर राष्ट्रीय निवड समिती टीम इंडियाची निवड करणार आहे. याप्रसंगी वन डे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता असून गेल्या काही सामन्यांमध्ये सुमार फॉर्ममधून जाणाऱया डावखुरा सलामीवीर शिखर धवन याला आणखी एक संधी देण्यात येते की त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो हे पाहणे यावेळी रंजक ठरणार आहे.

सलामीवीराचा पर्याय

शिखर धवन 34 वर्षांचा असून आगामी काळात तो जास्त काळ क्रिकेट खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे त्याचा पर्यायी सलामीवीर म्हणून निवड समिती मयांक अग्रवालला संधी देऊ शकते. मयांक अग्रवालने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 50 च्या सरासरीने आणि जवळपास 100 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या नावालाही पसंती देण्यात येईल.

विराटपेक्षाही जास्त

रोहित शर्माने या वर्षी 25 वन डे व 11 ट्वेंटी-20 सामन्यांत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. मुंबईच्या या पठ्ठय़ाने कर्णधार विराट कोहलीपेक्षा तीन वन डे व चार ट्वेंटी-20 सामने जादा खेळले आहेत. आगामी धकाधकीचे वेळापत्रक पाहता रोहित शर्माला आगामी दौऱयासाठी विश्रांती देण्यात आल्यास आश्चर्य वाटायला नको.

शिवम, शार्दुल कायम, तर सुंदर, कृणालवर प्रश्नचिन्ह

जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांडय़ा व नवदीप सैनी हे खेळाडू अजूनही दुखापतीमधून बाहेर आले नसल्यामुळे त्यांचा आगामी मालिकेसाठी विचार होणार नाही. त्यामुळे शिवम दुबे व शार्दुल ठाकूर या खेळाडूंचे संघातील स्थान कायम असेल. पण वॉशिंग्टन सुंदर व कृणाल पांडय़ा यांना बांगलादेशविरुद्ध चमक दाखवता आली नाही. त्यामुळे त्यांच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह आहे. युजवेंद्र चहल व रवींद्र जाडेजा यांच्यापैकी कोणाला विश्रांती देण्यात येईल हेही पाहायला आवडेल. दीपक चहर संघाचा प्रमुख गोलंदाज असेल, तर खलील अहमदला आपल्या इकॉनॉमी रेटवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. रिषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्यामध्ये यष्टिरक्षणाची चुरस असली तरी रिषभ पंतच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या