सुबक ठेंगणी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विद्या कुलकर्णी

मखमाली निळा रंग आणि मादक बांधा… शिलींध्री पक्षी… हिंदुस्थानच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे दोन्ही ठिकाणी आढळतो…

सत्तालमध्ये अचानक माझे लक्ष एका छोटया , सुबक व मादक बांधा असलेल्या, निळसर – राखाडी रंगाच्या पक्ष्याने वेधून घेतले. हा पक्षी इतर पक्ष्यांपेक्षा वेगळाच वाटला. घट्ट पायाने फांदी धरून आडव्या रेषेतील पवित्र्यात तो बसला होता. थोडयाच वेळात त्याने स्वतःला झाडाला उलटे टांगले, जणू कोणीतरी त्याला शिक्षाच दिली होती. या पक्ष्याचे नाव होते शिलींध्री. ह्या पक्ष्यांच्या पंजे लांब असून बोटं बळकट असतात व त्यामुळे ते स्वतःला उलटे टांगून इतर पक्ष्यांना दिसू शकणार नाहीत असे भक्ष्य झाडावर शोधू शकतात. झाडाच्या खोडावर ’वर – खाली’ दोन्ही प्रकारेही जाऊ शकतात.

शिलींध्री पक्ष्यांना इंग्रजीत ` Nut hacker’ म्हणतात कारण ते कठीण कवचाची फळे चिरेत अथवा भेगेत दाबून त्यावर चोचीने प्रहार करून फोडतात. हे पक्षी आपल्या घरटय़ाचे प्रवेशद्वार चिखलाने लिंपतात म्हणूनच त्यांचे `Mud Dabbler’ असेही नाव प्रचलित आहे. शिलींध्री पक्षी sittidae कुटुंबातील असून त्यांच्या 25 प्रजाती आहेत. पाय लहान व पंख घट्ट, संकलित असतात. शेपटी 12 पिसांची असून चौकोनी आकाराची असते. चोच लांब, मजबूत व टोकदार असते. पंजे लांब असून बोटं बळकट असतात. एक बोट मागील बाजूस वळलेले असल्यामुळे झाडावर घट्ट पकड घेता येते. ह्या पक्ष्यांची पाठ निळसर राखाडी रंगाची व डोळ्याच्या खालील भाग पांढरा असतो. प्रजातींप्रमाणे हे रंग जांभळा, नारिंगी, लालसर-तपकिरी, फिक्कट पिवळा असे वेगवेगळे असतात. डोळ्यांना एक लांब काळी पट्टी असून भुवई पांढरी असते. कपाळ गडद असून काळसर टोपी असते. नर मादी सारखेच दिसतात, फक्त मादीचा खालील भागाच्या बाजूवरील व शेपटीखालील रंग नरापेक्षा फिक्कट असतो.

हे पक्षी कीटकांवर उपजीविका करणारे असून सूर्यफुलांच्या बिया, कठीण कवचाची फळे सुद्धा खातात. हे पक्षी झाडाच्या सालीच्या आतील बाजूस चिकटलेले किडे, कीटक, कोळी खाऊ शकतात. दुष्काळाच्या काळाची तजवीज करण्यासाठी दररोज शंभरच्या संख्येत बियाणं साठवून ठेवतात. त्यासाठी फांद्यांमधील भेगांचा उपयोग करतात. कधी कधी हे पक्षी इतर पक्ष्यांच्यात मिसळून खाद्य शोधतात परंतु इतर पक्षी कुरघोडी करू लागल्यास त्यांना धाकदपटशा दाखवून पळवून लावतात. सूर्यफुलाची बियाणं त्यांचे सर्वात आवडते खाद्य असून त्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशात चांगले बीजारोपण होते.
हे पक्षी गोंगाट करणारे असून वसंत ऋतूत सर्वात ज्यास्त आवाज करतात. त्यांचे गाणे बरेच कंपनयुक्त स्वर, साद, शीळ यांचे मिश्रण असते. प्रजननाच्या काळात मात्र गाणे साधेच असून शीळ बरीच लांब असते. या पक्ष्यांचे आयुष्यमान 2 ते 3.5 वर्ष असते.

हे पक्षी हिंदुस्थानी उपमहाद्वीप, तिबेट बांगलादेश, भूतान आणि नेपाळमध्ये आढळतात. त्यांचे वास्तव्य हिंदुस्थानात दक्षिणेकडील कॉफी लागवडीच्या प्रदेशात असते.

बदामी पोटाची शिलींध्री / Chestnut Bellied Nuthatch
या पक्ष्यांची लांबी 13 सें. मी. असून चोच मोठी व राखाडी-निळ्या रंगाची असते. मुकुट व शरीरही राखाडी-निळ्या रंगाचे असते. पंखांमध्ये व शेपटीमध्ये गडद रंगाच्या रेषा असतात. पोटाचा भाग लालसर तपकिरी असून डोळ्यापासून काळसर पट्टा असतो.
या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ एप्रिल ते मे असतो. त्या काळात नर मादीला रिझवण्यासाठी खाद्य आणून देतो. या पक्ष्यांचे ‘ओक झाड’ हे आवडते निवासस्थान आहे. झाडांच्या फटीत किंवा सुतार पक्ष्याच्या घरटयाच्या जागेत आपले घरटे बनवतात.

मखमली शिलींध्री
या पक्ष्यांची लांबी 12.5 सें. मी. असून वरील बाजूस निळ्या जांभळ्या रंगाचे व गाल फिक्क्या जांभळ्या रंगाचे असतात. खालील बाजू फिक्कट तपकिरी रंगाची असून डोळे पिवळे व गळा पांढऱया रंगाचा असतो. बुबळं फिक्कट पिवळ्या रंगाची असून चोच लाल रंगाची व कपाळावर आणि मानेखाली काळ्या रंगाचा पॅच असतो. मात्र शिशु पक्ष्यांमध्ये पॅच नसतो. त्यांची चोच व शेपटीची टोकं गडद रंगाची असतात. नर पक्ष्याची भुवई काळी असून दोन्ही डोळ्यांना जोडणारी डोक्यावर व मानेखाली काळी पट्टी असते . मादीला भुवई नसून खालील बाजूचे रंग थोडे गडद असतात.
ह्या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ हिंदुस्थानात उन्हाळ्यात असतो. त्यांची घरटी झाडांच्या भोकात किंवा फटींमध्ये असून शेवाळे, पिसे, फर, गवत यांचा थर आतील बाजूला लावलेला असतो. मादी 3 ते 6 अंडी देते. ती पांढऱया रंगाची असून त्यावर लाल ठिपके असतात. अंडी उबवण्याचे काम मादी करते मात्र पिल्लांना खाद्य नर व मादी दोघेही देतात.

[email protected]